भुसावळात धारदार गुप्तीसह दोघांना अटक

भुसावळ : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री नवरात्रोत्सवाची विसर्जन मिरवणुक सुरू असतांना दोघे दुचाकीवरून धारदार गुप्ती घेवून फिरत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बुधवारी रात्री 9.45 वाजेदरम्यान शहरातील कुंभार वाड्याकडून महाराणा प्रताप चौकाकडे दोन जण दुचाकीवरून जात असताना नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या निवासस्थानासमोर दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीसाठी गस्त घालीत असलेले पोलीस हवालदार मोहम्मद अली सैय्यद यांंना दुचाकीवर मागे बसलेल्या एकाच्या पाठीवर शर्टाखाली एक लांब काडी लपवलेली असल्याचे दिसून आले. त्यांनी पाठलाग करून त्यांची तपासणी केली असता शर्टाच्या खाली एक हजार रुपये किंमतीची एक 28 इंच लांब धारदार गुप्ती आढळली. या प्रकरणी निलेश मधुकर चौधरी (40) व देवेंद्र लक्ष्मण वाणी (दोन्ही रा.गरूड प्लॉट, भुसावळ) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल समाधान पांडुरंग पाटील यांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
