दीपनगर गोळीबार प्रकरण : आरोपीला दोन दिवसांची कोठडी

भुसावळ : दोन कंत्राटदारांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर एका कंत्राटदाराने दुसर्या कंत्राटदारावर थेट गावठी कट्ट्यातून गोळी झाडली मात्र सुदैवाने नेम चुकल्याने कंत्राटदार बचावल्याची घटना गुरुवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास ही घटना दीपनगरातील वसाहतीमध्ये घडली होती. या प्रकरणी अॅश वाहतूक कंत्राटदार दीपक मधुकर हतोले (38) यांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी आरोपीला भुसावळ सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शुभेच्छा देत चालवली गोळी
दीपनगरातील अॅश कंत्राटदार मुकेश शैलेंद्र तिवारी यांच्याशी व्यावसायीक संबंधातून हतोले यांचे वाद सुरू होते. त्यातच गुरुवारी तिवारी यांचा काटा काढण्याच्या उद्देशाने आरोपीने तिवारींचे घर गाठत घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी लावली व त्याचवेळी तिवारी दरवाजात आल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर कट्टा रोखत गोळी झाडली मात्र दोघांमध्ये झालेल्या झटापटीत नेम चुकला शिवाय कट्टा खाली पडून रीकामी कॅप तसेच मॅग्झीनही कट्ट्यातून सटकली. तिवारींच्या सतर्कतेमुळे अप्रिय घटना टळली होती मात्र आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर तालुका पोलिसांनी काही तासात त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. शुक्रवारी आरोपीला भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीतर्फे अॅड.मनीष सेवलानी यांनी युक्तीवाद केला.
गोळीबार नाहीच -निरीक्षक रामकृष्ण कुंभार
तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा करण्यात आला असून आरोपीनेच तिवारींच्या भेटीपूर्वी फटाक्यांची आतषबाजी केली होती शिवाय घटनास्थळावरून गावठी कट्टा, मॅग्झीन तसेच गोळीची कॅप तसेच तिचे पुढचे टोकदेखील जप्त करण्यात आले असल्याची माहिती निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली. गोळीबार झाला नसल्याचा त्यांनी दावा करीत पोलिसांकडून योग्य दिशेने तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
