विधानसभा निवडणुकीत उमेदवारांकडून हायटेक प्रचार


सोशल मिडीयावरील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने मतदारांची होतेय करमणूक : निवडणूक आयोगही लक्ष ठेवून

भुसावळ : गत दशकापुर्वीच्या निवडणुकीतील प्रचाराचा फंडा दिवसेंदिवस बदलत असून सध्याच्या स्थितीत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांपर्यंत उमेदवारांचे कार्य पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये सायंकाळच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी वाहनावरील एलईडीच्या स्क्रिनवर उमेदवारांचे महत्व पटवून देण्यासाठी चित्रफिती दाखवल्या जात आहेत त्यामुळे उमेदवारांची पूुर्वी होणारी भटकंती काहीशा प्रमाणात कमी होवून प्रचार कार्यालयातूनच जास्त सुत्रे हलवण्यावर भर दिला जात आहे.

प्रचारामुळे मतदारांचेही मनोरंजन
गत काही दशकापुर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांची चांगल्याच प्रकारे तारांबळ होत असे मात्र काळानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणुकीतील प्रचाराला हायटेक स्वरूप दिले जात आहे. यामध्ये व्हॉटसअ‍ॅप ग्रृप व सोशल मिडीयाचाही समावेश आहे. चारचाकी वाहनांवर एलईडी स्क्रिनवर उमेदवारांनी केलेली विकासकामे शिवाय त्यांची जनमानसातील असलेली स्वच्छ प्रतिमादेखील पटवून देण्यावर प्राधान्य देण्यात आले आहे. एलईडी स्क्रिनचे वाहन सायंकाळी वर्दळीच्या ठिकाणी उभे करून प्रचाराला प्राधान्य दिले जात आहे तसेच उमेदवारांच्या प्रचारार्थ तीनचाकी वाहनांवर लावण्यात भोंग्याचा आवाजही गल्ली बोळापर्यंत पोहचवला जात आहे. यामध्येही एका उमेदवाराचे प्रचाराचे वाहन त्या भागातून दुसर्‍या भागात जाताच त्या ठिकाणी दुसर्‍या उमेदवाराच्या प्रचाराचे वाहन येवून थांबत असल्याने मतदारांचेही मनोरंजन होत आहे.

उमेदवारांचे गाताय कार्यकर्ते गोडवे
सोशल मिडीयावरील प्रचाराचा फंडा चांगलाच रंगात येवू लागला असून ग्रुपवर कायर्र्कर्ते आपापल्या उमेदवारांचे गोडवे गातांना आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे दिसून येत आहे तसेच उमेदवारांच्या आधल्या दिवसाच्या प्रचाराचे नियोजन ग्रुपवर प्रसिद्ध केले जात असल्याने उमेदवार येण्याआधीच शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते सक्रिय होत असल्याचे चित्र आहे.

कार्यकर्त्यांची केली जातेय देखभाल
प्रचारात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांची पदाधिकार्‍यांकडून चांगल्या प्रकारे देखभाल केली जात आहे तर सायंकाळी महामार्ग व इतर भागातील हॉटेल्स व ढाब्यांवर श्रमपरीहारासाठी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे. यामूळे अशा ठिकाणी आपापल्या उमेदवारांचे गोडवे गातांना दिसून येत असल्याने प्रचारामध्ये चांगलीच रंगत येत असल्याचे दिसून येते. निवडणुकीमूळे अनेक बेरोजगारांना दहा दिवसापर्यंत रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.यामुळे निवडणुकीनंतर येणारा दिवाळीचा सण अति उत्साहाने साजरा होणार असल्याचीही जाणकारांमध्ये चर्चा होवू लागली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !