आमदार संजय सावकारेंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी लावून फिरा


खासदार रक्षा खडसे यांचे वरणगावात प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना आवाहन

भुसावळ : जनसेवेचा वारसा घेऊन गेल्या दहा वर्षांपासून मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेतलेले भाजपा-शिवसेना, आरपीआय, रासप, राजप, महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी लावून फिरा, असे आवाहन खासदार रक्षाताई खडसे यांनी वरणगाव येथे प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना केले. आमदार सावकारे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी वरणगाव शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. प्रसंगी भोगावती नदी जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रॅली आल्यानंतर पुतळ्याला खासदार खडसे व आमदार संजय सावकारे यांनी अभिवादन केले. याप्रसंगी खासदार रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत वरील आवाहन केले.

यांचा प्रचार रॅलीत सहभाग
प्रचार रॅलीत भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, प्रशांत पाटील, शिवसेनेचे अ‍ॅड.निर्मल दायमा, चंद्रकांत शर्मा, रवी सुतार सुनील दिगंबर चौधरी, ज्ञानेश्वर मराठे, नगरसेवक गणेश धनगर, बबलू माळी, माजी नगराध्यक्ष अरुण इंगळे, माजी सरपंच तथा नगरसेविका रोहिणी जावळे, नगरसेविका माला मेढे, माजी सरपंच सुभाष धनगर, सुभाष देशमुख, संजय डहाके, शेख खलील, शेख मिर्झा, तळवेल येथील सरपंच डॉ.सुनील पाटील, प्रकाश शक्ती यांच्यासह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले. यात युवक , महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

आमदारांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी
प्रचार रॅलीस येथील भवानी मंदिरापासून प्रारंभ झाला. प्रचारफेरी विकास कॉलनी, मदिना चौक, भोईवाडा, ईस्लामपुरा, गांधी चौक, हनुमान मंदिर, माळीवाडा, चौधरी वाडा, रावजी बुवा चौक, मोठी होळी आदी परीसरातून काढण्यात आली. प्रसंगी आमदार सावकारे यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.

विकासकामांमुळे विजय निश्‍चित -खासदार खडसे
वरणगावातील छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ रॅली आल्यानंतर खासदार खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आमदार सावकारे यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध विकास कामे केली असून शहरात अमृत योजना आणून शहरातील पन्नास वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे शिवाय रस्त्यांसाठी नगरपालिकेला निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागात मुख्य रस्त्याला प्रत्येक गावाचा रस्ता जोडण्याचे काम त्यांनी केले आहे. शहर व तालुक्यात तब्बल पाच सबस्टेशन उपलब्ध करून तालुक्यातील लोडशेडिंगचा प्रश्नच त्यांनी मार्गी लावला असून शहराला अंधारातून बाहेर काढले आहे. एमआयडीसीमध्ये रस्ते, पाणी, वीज उपलब्ध करून दिली असून त्यामुळे येथे मोठे उद्योग सुरू करण्यास वाव मिळणार आहे. मोठे उद्योग उभे राहिल्यास बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. त्याचप्रमाणे शेती सिंचनासाठी ओझरखेडा प्रकल्पातून पूर्ण तालुक्यातील शेतीला पाणी देण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. न्यायालयाच्या इमारतीसह तहसील, प्रांत कार्यालय आदी विविध इमारती उपलब्ध करून देण्यात त्यांनी यश मिळवले आहे तर गरीब गोरगरीबांसाठी ग्रामीण रुग्णालय पूर्णत्वास येत आहे. अशा विविध विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी काम केले असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावाही याप्रसंगी खासदार खडसे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !