भुसावळसह रावेर शहरात पोलिसांचे पथसंचलन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरीकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण : सशस्त्र पथसंचलनाने गुन्हेगारांमध्ये धडकी
भुसावळ : गोळीबार तसेच हत्याकांडांमुळे चर्चेत आलेल्या शहरात विधानसभा निवडणुका शांततामय व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे पथसंचलन करण्यात आले. मंगळवारी कंडारी जिल्हा परीषद शाळेपासून तर समता नगरापर्यंत पथसंचलन करण्यात आले तर बुधवारी शहर पोलिस ठाणे हद्दीतून सशस्त्र पथसंचलन करण्यात आले.
शहरात सशस्त्र पथसंचलन
भुसावळ शहरात गेल्या काही महिन्यांपासून खुनाच्या घटना, गावठी कट्टे, गोळीबार अशा विविध गुन्ह्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने शहरातील नागरीक व व्यावसायीक कमालीचे धास्तावले असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी धास्तावलेल्या शहरवासीयांना व शहरातील उपद्रवींवर वचक निर्माण व्हावा यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातून पथसंसलन केले.शहरात मंगळवारी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्यापासून पथसंचलनाला सुरुवात झाली.
शहरातील विविध भागातून पथसंचलन
पथसंचलन महात्मा गांधी पुतळा, जळगाव रोड, मामाजी टॉकीज रोड, जामनेर रोड, आठवडे बाजार, मरीमाता रोड, लक्ष्मी चौक, जाम मोहल्ला, रजा टॉवर व बसस्थानक मार्गे पुन्हा शहर पोलिस ठाण्याजवळ आले. पोलिसांच्या या पथसंचलनात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, सीआरपीफ, होमगार्ड सहभागी झाले होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर येथे पोलिसांचे पथसंचलन
रावेर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरातील संवेदनशील आणि संमिश्र लोकवस्तीतून मंगळवारी सकाळी 10.30 वाजता पोलिसांनी पथसंचलन केले. फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस कर्मचारी, सीआयएसएफचे अधिकारी, जवान, आरसीपीचे प्लाटुन तसेच जवान व होमगार्ड पथक सहभागी झाले. होते. शहराच्या प्रमुख रस्त्यावरून रूट मार्च करण्यात आला.
नागरीकांमध्ये सुरक्षिततेची हमी
रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचशील चौक, बंडू चौक, संभाजी नगर, नागझिरी चौक, महात्मा फुले चौक, राजे शिवाजी चौक, कारागीर नगर, भोई वाडा, गांधी चौक मार्गे रावेर पोलिस स्टेशन या मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमम्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक नाईक व रावेर पोलीस स्टेशनचे 25 कर्मचारी, 70 होमगार्ड, सीआयएसएफ प्लाटूनचे दोन अधिकारी तसेच 58 कर्मचारी, आरसीपी प्लाटूनचे 22 कर्मचारी सहभागी झाले.
