भुसावळातील महिलेचा मोबाईल लांबवणारे भामटे जाळ्यात

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
भुसावळ : जेवण झाल्यानंतर शतपावली करीत घराबाहेर पडलेल्या महिलेच्या हातातील महागडा मोबाईल धूम स्टाईल चोरट्यांनी लांबवल्याची घटना 14 सप्टेंबर 2019 रोजी शारदा नगर भागातरन शैलेश पाटील यांच्या घरासमोर घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.विकास भानुदास गोरखा (19) व आकाश लखन रमेश परदेशी (22, दोन्ही रा.कवाडे नगर, रेल्वे फिल्टर हाऊसजवळ , भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
14 सप्टेंबर रोजी पल्लवी निशिकांत देशमुख (रा.भोळे कॉलनी, आदित्य अपार्टमेंट, भुसावळ) या जेवण झाल्यानंतर घराबाहेर फिरण्यासाठी निघाल्यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फोनवरून बोलत असताना 18 ते 20 वयोगाटातील तरुणांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवर येत अलगद देशमुख यांच्या हातातील मोबाईल लांबवला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाटील, अनिल इंगळे, सुरेश महाजन, नरेंद्र वारुळे, संतोष मायकल, सुनील दामोदरे, रमेश चौधरी, दिनेश बडगुजर, मिलिंद सोनवणे व एएसआय अशोक महाजन यांनी गोपनीय माहितीवरून कवाडे नगर, रेल्वे फिल्टर हाऊसजवळील आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील वापरलेली दुचाकी व मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपींना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
