राज्यात पुन्हा धावणार एस.टी. ? शरद पवारांच्या उपस्थितीत एस.टी.सुरू करण्यावर एकमत
मुंबई : एस.टी.चे राज्य शासनान विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी दोन महिन्यांपासून एस.टी.कर्मचार्यांचा संप (St workers Strike) सुरू असून या संदर्भात सोमवारी तोडगा निघण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Ncp Leader Sharad Pawar), राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि कर्मचारी कृती समिती यांच्यात चर्चा झाली. एस.टी.कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, एस.टी.ची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरू झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी (Sharad Pawar) दिली. या बैठकीत कृती समितीच्या विविध सदस्यांनी आपली भूमिका मांडत आमच्या शंकांचे निरसण झाल्याचे सांगितले तसेच अॅड.गुणरत्न सदावर्ते यांना निवडणं ही आमची चूक होती, असे देखील कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीनंतर राज्यात लालपरी पुन्हा सुरू होण्याची आशा असलीतरी दुसरीकडे कर्मचारी मात्र मागण्यांवर ठाम आहेत.
सातव्या वेतन आयोगाबाबत निर्णय घेणार : अनिल परब
परीवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) म्हणाले की, ज्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, अशा कर्मचार्यांवर यापुढेही कोणती कारवाई होणार नाही. एस.टी.कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, कर्मचार्यांचे सर्व प्रश्न चर्चा करून सोडवण्यात येतील शिवाय एस.टी.कर्मचार्यांच्या आंदोलनादरम्यान ज्या कर्मचार्यांवर कारवाई झाली आहे, त्यावर एसटी (ST) सुरू झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.





कर्मचार्यांचा संभ्रम झाला दूर
मंत्री अनिल परब (Anil Parab) म्हणाले, विलीनीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) गठित केलेली तीन सदस्यांची समिती निर्णय घेईल. ही समिती आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करेल. या अहवालाचे पालन राज्य सरकार आणि एसटी कर्मचार्यांना करावं लागेल. कर्मचार्यांना मूळ पगारात पाच हजार, चार हजार आणि तीन हजार अशी पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला होता परंतु काही कर्मचार्यांमध्ये याबाबत संभ्रम झाला होता. आजच्या बैठकीतून कर्मचार्यांचा हा संभ्रम दूर झाला आहे. आतापर्यंत कर्मचार्यांना तीन वेळा मुदत दिली होती. परंतु, कर्मचार्यांनी आपला संप मागे घेतला नाही. जे कर्मचारी कामावर परत येतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही. कर्मचार्यांनी लवकरात लवकर कामावर रूजू व्हावे, असे आवाहन परब यांनी केले आहे.
जीवनवाहिनी सुरू व्हायला हवी : शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Ncp Leader Sharad Pawar) म्हणाले की, दोन महिने संपामुळे प्रवाशों अतोनात हाल झाले आहेत. या सगळ्या गोष्टीचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होत आहे. सरकारच्या निर्णयामध्ये काही कमतरता आहेत, हे कृती समितीने निवेदन आणून दिले त्याही बाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी मंत्री महोदयांनी दिली आहे. कृती समितीचे 20-22 प्रतिनिधी आहेत त्या सर्वांना कामगारांच्या प्रश्नांचा जसा आग्रह आहे जो रास्त आहे, त्याप्रमाणे प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे, याही बाबतीत ते सकारात्मक आहेत त्यामुळे त्यांनी एसटी कर्मचार्यांना आवाहन केलं आहे. माझं आवाहन आहे कर्मचार्यांना आपली बांधीलकी प्रवाशांशी आहे, जे आवाहन कृती समितीने कर्मचार्यांना केलं आहे त्याचा गांभीर्याने विचार कर्मचार्यांनी करावा.
