भुसावळात वेगवेगळ्या घटनेत दोघांवर चाकू हल्ला

भुसावळ : शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे.गोळीबाराच्या घटनेनंतर किरकोळ कारणावरून चाकूहल्ल्याच्या घटना समोर येत आहे. शहरात दोन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये किरकोळ वादावरून चाकुहल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या रजा टॉवर चौकात अफजल शरीफ पिंजारी हा दारू पिऊन आला असता जुबेरखान मझहर खान यांनी दारू पिऊन रेल्वेमध्ये चहा विक्रीसाठी येवू नको, असे सांगितल्याचा राग आल्याने अफजल शरीफ पिंजारी व त्याचा काका सिकंदर पिंजारी या दोघांनी जुबेरखान याच्यावर चाकू हल्ला करीत जखमी केले. जखमी व चाकू हल्ला करणारे दोघेही रेल्वेत चहा विक्रीचा व्यवसाय करतात. या प्रकरणी जुबेरखान मझहरखान यांनी बाजारपेठ फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसर्या घटनेत मस्करीवरून चाकूहल्ला
दुसर्या घटनेत बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास श्रीराम नगरातील नवरंग चौकात काही मित्र गप्पा मारीत बसलेले असतांना या ठिकाणी निलेश ठाकूर हा आला असता जीवन देशमुख याने त्याची मस्करी केली. याचा त्याला राग आल्याने तो संतापात घरी निघून गेला व थोड्या वेळाने तो आणि त्याचा मेव्हणा त्या ठिकाणी येवून जीवन देशमुख यांच्याशी वाद घातला. वाद सुरू असतांनाच दोन्ही शालक-मेहुण्यांनी जीवनवर चाकुने हल्ला केला. जखमींवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोहनस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.
