नांदगाव तालुक्यातील जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण
नाशिक : नांदगाव तालुक्यातील जवानाला नेपाळ सीमेवर (Border of Nepal) वीरमरण आले आहे. कर्तव्यावर असताना विजेच्या तारीचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. जवानाच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. अमोल हिम्मतराव पाटील (Amol Himmatrao Patil) (30) असं वीरमरण आलेल्या जवानांचे नाव आहे. जवान अमोल यांच्या निधनांची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. सशस्त्र सीमा बल नेपाळ येथील विरपूर सीमेवर (virpur border) कार्यरत असलेला अमोल हे सहकाऱ्यांसोबत सीमेवर तैनात होते. त्याचवेळी सुरू असलेल्या कामात विजेच्या धक्क्याने अमोल (amol) यांना वीरमरण आले. या अपघातात अन्य दोन जवानांना देखील वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे.
बोलठाण येथे अंत्यसंस्कार होणार
दरम्यान, विरपूर सीमेवर (virpur border) त्याला वीरमरण आल्याची माहिती त्याचा बोलठाण येथे असणाऱ्या लहान भावाला मिळाली आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या जवान अमोलच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. जवान अमोल यांचे पार्थिव बोलठाण (boltana) येथे आणण्यात येणार असून केंद्र व राज्य सरकार यांच्या कोविड नियमांचे आधीन राहून त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नांदगावचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी दिली.



