भुसावळातील नारखेडे महाविद्यालयाला नॅक कमिटीचे मूल्यांकन जाहीर

भुसावळ : शहरातील के.नारखेडे महाविद्यालयाला 3 व 4 ऑक्टोंबर रोजी नॅक कमिटीने भेट देऊन महाविद्यालयाची पाहणी केली. या समितीच्या भेटीनंतर नुकतेच महाविद्यालयाला मूल्यांकन जाहीर करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील पहिलेच कायम विनाअनुदानित महाविद्यालयाने नॅक कमिटीला अहवाल सादर केल्याने मूल्यांकन प्राप्त केले आहे.
नॅक कमेटीने केली होती पाहणी
के.नारखेडे महाविद्यालयात नॅक कमिटी अंतर्गत हैदराबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.शिरीन दास, तामिळनाडूचे डॉ.निकोलस, गुजरात विद्यापीठाचे डॉ.नीता पंड्या या त्रीसदस्यीय समितीने 3 व 4 ऑक्टोबरला भेट दिली. या दोन दिवसीय भेटीवेळी महाविद्यालयाची इमारत परीसर प्रयोगशाळा विद्यार्थी सुविधा, गुणवत्ता उपलब्ध साहित्य यासह महाविद्यालयाने सादर केलेल्या अहवालाची शहानिशा केली तसेच माजी विद्यार्थी, पालक व्यवस्थापन मंडळ, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून गुणवत्तेसाठी केले जाणारे प्रयत्न याबाबतची माहिती जाणून घेतली व्यवस्थापन मंडळाशी चर्चा करून महाविद्यालयात राबविल्या जाणार्या उपक्रमांची माहिती घेतली. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थ्यांना 25% फी सवलत दिली जात असल्याची विशेष नोंद समितीने घेतली या माहितीच्या आधारे नुकतेच महाविद्यालयाला ‘क’ श्रेणीचे मूल्यांकन जाहीर करण्यात आले. या मूल्यांकनामुळे महाविद्यालयाचा दर्जा उंचावला असून भविष्यात ही श्रेणी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या मूल्यांकन समितीसाठी सुकाणू समितीतील सदस्य नाहटा महाविद्यालयाचे प्रा.एस.एन.नेहेते यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष श्रीनिवास नारखेडे, चेअरमन पी.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ.रामप्रकाश, प्रा.ए.जी.श्रीवास्तव व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
मूल्यांकन मिळणे गौरवाची बाब
सुसज्ज इमारत, अद्यावत साहित्य व गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे कायम विनाअनुदानित महाविद्यालय असतानादेखील नॅक कमेटीकडून सी श्रेणी मिळणे ही गौरवास्पद बाब असून यासाठी सर्व श्रेय हे महाविद्यालयाच्या संचालक मंडळासह कर्मचार्यांचे असल्याचे के.नारखेडे महविद्यालयाचे अध्यक्ष श्रीनिवास नारखेडे यांनी सांगितले.
