भुसावळात दहा तर रावेरात सात व मुक्ताईनगरात पाच उमेदवारांची अनामत जप्त


भुसावळ : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भुसावळात विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी हॅट्रीक साधली तर रावेरात विद्यमान आमदार हरीभाऊ जावळेंचा पराभव झाला तर मुक्ताईनगरातील माजी मंत्री एकनाथराव खडसेंची 30 वर्षांची सत्ता उलथवत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील विजयी झाले. तीनही ठिकाणच्या निवडणुकीत वैध मतांच्या तुलनेत 1/6 मते न मिळालेल्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. त्यात भुसावळ मतदार संघातील 12 उमेदवारांपैकी 10 उमेदवारांची तर रावेरात सात तसेच मुक्ताईनगरात पाच उमेदवारांची अनामत जप्त झाली.

भुसावळात जगन सोनवणेंसह दहा उमेदवारांची अनामत जप्त
भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगन सोनवणे यांच्यासह दहा उमेदवारांची अनामत जप्त झाली. भुसावळ मतदारसंघात एक लाख 50 हजार 654 मतदारांनी हक्क बजावला. विजयी भाजपचे उमेदवार संजय सावकारे यांना 81 हजार 689 मते मिळाली तर दुसर्‍या क्रमांकाची 28 हजार 675 मते अपक्ष उमेदवार डॉ.मधू राजेश मानवतकर यांना मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार जगन सोनवणे यांना 20 हजार 245 मते मिळाली. आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 1/6 अर्थात मतांच्या टक्केवारीत 16.66 पेक्षा कमी मते मिळालेल्या उमेदवारांची अनामत जप्त केली जाते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगन सोनवणे यांना 13.44 टक्के मते असल्याने त्यांचीही पाच हजार रुपयांची अनामत जप्त होईल तसेच मनसेचे नीलेश सुरवाडे, बसपाचे राकेश वाकडे, बहुजन मुक्ती पार्टीचे अजय इंगळे , इंडियन युनियन मुस्लिम लिगचे कैलास घुले, वंचित बहुजन आघाडीचे सुनील सुरवाडे, अपक्ष उमेदवार गीता खाचणे, नीलेश देवघाटोळे, यमुना रोटे, सतीश घुले या सर्व उमेदवारांची अनामत जप्त झाली.

रावेर विधानसभेत सात उमेदवारांची अनामत जप्त
रावेर- रावेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे शिरीष मधुकरराव चौधरी यांनी 77 हजार 941 मतांसह विजय मिळवला. भाजपचे हरीभाऊ माधव जावळे यांना 62 हजार 232 मते मिळाली. अपक्ष अनिल छबीलदास चौधरी यांनी 44 हजार 841 एवढी मते घेतली. या व्यतिरिक्त उर्वरीत सात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यात बहुजन समाज पार्टीचे संतोष ढिवरे, एमआयएमचे विवेक ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे हाजी सैय्यद मुश्ताक, गयासोद्दीन काझी (अपक्ष), राजाराम सोनार (अपक्ष), डी.डी.वाणी (अपक्ष), संजय तडवी (अपक्ष) यांची अनामत जप्त झाली.

मुक्ताईनगरात पाच उमेदवारांची अनामत जप्त
मुक्ताईनगर- विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरातील सात उमेदवार रींगणात होते. शेवटच्या 23 व्या फेरीपर्यंत चुरशीची लढत बघायला मिळाली. निवडणुकीत सातपैकी पाच उमेदवारांची अनामत जप्त झाली, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शाम वाडकर यांनी दिली. यात भगवान इंगळे (बहुजन समाज पार्टी), राहुल पाटील (वंचित बहुजन आघाडी), संजू इंगळे (बहुजन मुक्ती पार्टी), ज्योती पाटील (अपक्ष), संजय कांडेलकर (अपक्ष) यांचा समावेश आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !