डॉक्टर दाम्पत्यास मारहाण करीत सशस्त्र दरोडा : पाच लाखांचा ऐवज लांबवला
मसूर : सशस्त्र दरोडेखोरांनी डॉक्टर दांपत्यास बेदम मारहाण करत वारे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना संतोषीमाता नगरात घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात डॉ. संपत इराप्पा वारे व अनिता संपत वारे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अज्ञात चोरट्यांनी टाकला धाडसी दरोडा
सेवानिवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी उचकटून अज्ञात दरोडेखोरांनी मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास डॉ. वारे व पत्नी अनिता वारे यांना दांडक्याने मारहाण केली व गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर हॉलमध्ये झोपलेल्या पुष्पा जगदाळे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व नऊ हजार रुपये रोकड काढून घेतली. डॉक्टर वारे यांची सून पूजा हिने गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण व कानातील टॉप्स त्यांना काढून दिले. दरोडेखोरांनी डॉ. वारे यांच्या घराबाहेर लावलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून दमदाटी करून दरोडेखोर निघून गेले.




