सासू-सुनांना ओलिस ठेवत दरोडेखोरांनी लांबवले 70 तोळे सोने : या शहरातील घटना
नाशिक : घरातील महिलांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून त्यांना चाकूचा धाक दाखवत अंगावरील दागिन्यांसह कपाटात ठेवलेले दागिने व दीड ते दोन लाखांची रोकडसह सुमारे 70 तोळे लुटण्यात आले. ही धक्कादायक घटना त्र्यंबकरोडवरील सातपुर कॉलनीजवळ असलेल्या लाहोटीनगरमधील भगवान गड नावाच्या मोठ्या बंगल्यात सोमवारी पहाटे घडली.
पाच दरोडेखोरांचा कसून शोध
सातपुर परीसरातील लाहोटीनगरमधील उद्योजक बाबासाहेब संतोष नागरगोजे यांचा भगनवान गड नावाचा मोठा बंगला आहे. या बंगल्यात सकाळी त्यांची वयोवृद्ध पत्नी शहाबाई नागरगोजे, सून मंगल रवींद्र नागरगोजे, आरती गणेश नागरगोजे या होत्या. घरात कोणीही पुरुष नसल्याची संधी साधत पाच दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत सर्वप्रथम शहाबाई यांच्या गळ्याला चाकू लावला. शहाबाईंचा आवाज ऐकून वरील खोल्यांमध्ये असलेल्या त्यांच्या दोन्ही सुना बैठक खोलीत आल्या असता दरोडेखोरांनी त्यांनाही चाकूचा धाक दाखविला. सासु-सुनांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून त्यांना धाक दाखवून देवघराजवळ बंदी बनवून ठेवले. यावेळी वरच्या खोलीत कपाट उघडून चोरट्यांनी त्यामध्ये ठेवलेले सुमारे 60 ते 70 तोळे सोने व दोन लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. चौघा दरोडेखोरांनी तोंड उघडे ठेवलेले होते, तर एकाने तोंडावर मास्क घातलेला होता, अशी माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.





