मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांची नियंत्रण कक्षात बदली
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ यांची सोमवारी सायंकाळी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभेत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अवैध धंद्यांसह गुन्हेगारीचा ठपका ठेवत तसेच गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने लक्षवेधी मांडून सभागृहाचे नुकतेच लक्ष वेधले होते. गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी अन्य जिल्ह्यातील वरीष्ठ पोलिस अधिकार्यांकडून 15 दिवसांच्या आत मुक्ताईनगर निरीक्षकांची चौकशी करण्यासह निरीक्षकांच्या बदलीचे आश्वासन यावेळी दिले होते.
गृह राज्य मंत्र्यांनी दिले होते स्पष्टीकरण
मुक्ताईनगरातील गुन्हेगारीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोट ठेवत लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष वेधले असता गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी मुक्ताईनगरमध्ये दारुबंदी आणि जुगाराच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगत 2020 मध्ये दारुबंदीचे 84 तर 2021 मध्ये 105 गुन्हे दाखल असून 2020 मध्ये जुगाराचे 25 तर 2021 मध्ये 36 गुन्हे दाखल केल्याचे सभागृहात सांगितले होते तर हलखेडा येथील दरोड्याच्या गुन्ह्यात 9 पैकी 6 आरोपी अटकेत असून इतरांचा शोध सुरू असल्याचे गृहराज्यमंत्री म्हणाले होते. 2021 मध्ये मुक्ताईनगर हद्दीत तडीपारीचा एक प्रस्ताव होता, असे गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.


बोदवड निरीक्षकांकडे पदभार
मुक्ताईनगर पोलिस निरीक्षकांची सोमवारी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही मात्र बोदवड पोलिस निरीक्षकांकडे पदभार सोपवण्यात आला आहे. बदलीच्या वृत्ताला ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दुजोरा दिला.
मुक्ताईनगर निरीक्षकांची अन्य जिल्ह्यातील अधिकार्यांकडून चौकशी : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई


