मध्यप्रदेशात खून : हलखेडा येथून आरोपीला अटक
मुक्ताईनगर : मध्यप्रदेशात केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात समावेश असलेल्या एका आरोपीस मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे अटक करण्यात आली. संशयीताला मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चुहा उर्फ इतवारसिंग विजयसिंग बहेलिया (23, रा.गांधीग्राम, जि.पन्ना, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
खून करून संशयीत पसार
मध्यप्रदेशातील पन्ना परीसरात काही दिवसांपूर्वी एका इसमाचा खून झाला होता. त्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी महाराष्ट्रात आल्याची पोलिसांना कळाल्यानंतर मध्यप्रदेश पोलिस जळगाव जिल्ह्यात तपासासाठी आले होते. संशयीत आरोपी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे समजल्यावरून त्यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्य्याशी संपर्क साधला. निरीक्षक राहुल खताळ यांनी कुर्हा पोलिस चौकी गाठत पोलिसांना सूचना दिल्या. व मध्यप्रदेशातील तपासकामी आलेले एएसआय आर.के.पांडे, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मी नारायण, निरज रेकेवार, उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोलिस नाईक गणेश मनुरे, नितीन चौधरी, एएसआय सादिक पटवे, हवालदार श्रावण जावरे, संजय लाटे, सागर सावे, प्रदीप इंगळे, राहुल नावकर आदींच्या पथकाने हलखेडा शिवारातून पसार आरोपी इतवार सिंग बहेलियाच्या मुसक्या आवळल्या.




