क्रांतीकारकांच्या जीवन व कार्याची गावागावात पारायणे व्हावीत : प्रा.जतीन मेढे


भुसावळ : भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आम्हा भारतीयांची देशभक्तीची गाथा आहे. हौतात्म्य पत्करून आपलं सर्वस्व देशा साठी वाहिलेल्या या क्रांतीकारकांचे जीवन आणि कार्य प्रत्येक पिढीला व भारतीयाला कळण्यासाठी गावागावात त्यांच्या कार्याची पारायणे व्हावीत, असे प्रतिपादन प्रा.जतीन मेढे यांनी केले. ते शहीद भगतसिंग फौंडेशन ,भुसावळ आयोजित शहिद दिनाच्या अभिवादन कार्यक्रमात बोलत होते .

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास शहिद भगतसिंग फौंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपुरे, सैयद फारूक, सैयद रऊफ, संघरत्न सपकाळे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना प्रा.मेढे म्हणालेत की, आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. स्वतंत्र भारताचे नागरीक म्हणून जे सन्मानाने आपण जगतोय ही पुण्याई स्वातंत्र्य चळवळीत आपल्या जीवनाची होळी करणार्‍या आमच्या देशभक्त क्रांतीकारक व स्वातंत्र्य चळवळीतील योध्यांची आहे. त्यांचे स्मरण आम्हास सतत असले पाहिजे. शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सारख्या क्रांतीकारकांचे कार्य आमच्या प्रेरणेचे व देशभक्तीचे दीपस्तंभ आहेत. ते प्रत्येक भारतीय तरुणांचे देशभक्तीचे विद्यापीठ झाले पाहिजे. वर्तमान समाज जीवनात आम्हास कृतीशील देशभक्तीची गरज आहे. त्यासाठी शहिदांचे जीवन व कार्य यांची पुनः पुनः उजळणी होणे आवश्यक आहे. देशभक्तीच्या या मशाली आमच्या मनामनात सतत पेटलेल्या हव्यात. कुठल्याही वादळात त्या विझता कामा नये. वर्तमान समाज जीवनात त्याचीच गरज आहे. त्यासाठी तरुणांनी शहिद भगतसिंग व इतर क्रांतिकारकांच्या जीवन व कार्याचा अभ्यास करायला हवा. कृतीशील देशभक्ती देशाला एकसंघ व मजबूत बनविते. देशाचे स्वातंत्र्य अबाधीत ठेवते.देशासाठी अमर हुतात्मे झालेल्या या क्रांतीकारकांचे आम्हास कधीही विस्मर ण होता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आभार शहिद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपूरे यांनी मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !