चिंचखेडा खुर्द परीसरात बिबट्याच्या दर्शनाने घबराट
मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्हा-वढोदा या रहदारीच्या रस्त्यावरील असलेले चिंचखेडा खुर्द गावाच्या अगदी जवळ बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने दखल घेवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
बिबट्याच्या दर्शनाने घबराट
चिंचखेडा खुर्द येथे बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कुत्र्यांच्या जोरजोराने भुंकण्याचा आवाज आल्याने झोपेतून जागे झालेल्या अनंता गजानन पाटील या तरुणाला बिबट्या नाल्याजवळ बसलेला दिसल्याने घाबरलेल्या तरुणाने मित्र नामदेव पाटील याला उठविले. बिबट्यासमोरच दहा-पंधरा फुटांवर बांधलेली गुरे असलेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजामुळे व तरुणांनी केलेल्या आवाजामुळे बिबट्या पसार झाला. गावाच्या उंबरठ्यापर्यंत धडकलेला बिबट्या केव्हाही पुन्हा गुरांवर हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेता वनविभागाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

गुरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे
लोकांनी रात्री-अपरात्री एकटे बाहेर पडू नये. गुरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. काही आढळल्यास वनविभागासोबत संपर्क करावा, असे आवाहन कुर्हा वनपाल बी.आर.मराठे यांनी केले आहे.


