आधार सर्वरच्या तांत्रिक अडचणीमुळे रावेर तालुक्यात धान्य वितरण रखडले
रावेर : राज्यात आधार सर्वरला सतत येत असलेल्या तांत्रिक समस्येमुळे तसेच आधार संलग्न सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एनआयसी नवी, दिल्ली आणि हैदराबाद येथील सर्वरवर येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे मागील दोन-तीन महिन्यांपासून राज्यातील पॉस मशीनद्वारे होणारे धान्य वितरण विस्कळीत झाले आहे. ज्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा उपलब्ध आहे त्या दुकानांमध्ये पॉस मशीनवर धान्य उपलब्ध नाही. याउलट ज्या दुकानांच्या मशीनवर धान्यसाठा उपलब्ध आहे त्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा पोहोच झालेलाच नाही. यामुळे धान्य वितरण थांबलेले असून शिधापत्रिका धारकांमध्ये रेशन दुकानदारांविरोधात असंतोष वाढत चालला आहे.
धान्य वितरणात अनियमितता
मुदत संपल्याने कालबाह्य झालेल्या ई-पॉस मशीन्समुळे धान्य वितरणात नियमितता राहिलेली नाही. पॉस मशीनला सततच्या येणार्या तांत्रिक समस्यांमुळे विशेषतः सर्वर डाऊन व आधार प्रमाणीकरण न होणे तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गंत मोफत धान्य वाहतूक आणि वितरणाचा अतिरिक्त ताण यामुळे देखील धान्याचे ऑनलाईन वितरण वेळेत आणि मुदत वाढीनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही.

ई पॉस मशीन कालबाह्य
तसेच ई पॉस मशीन या कालबाह्य झालेल्या आहेत. ई पॉस मशीन बदलवून मिळणे, त्यावरील सीम कार्ड न चालणे, स्वस्त धान्य दुकानदार स्वतःच्या मोबाईलवरुन हॉटस्पॉट द्वारे ई-पॉस मशीन चालवत असून त्याचाही भूर्दंड दुकानदारांना सहन करावा लागतो. या सर्व तक्रारींमुळे राज्य शासनाने ई-पॉस मशीन संदर्भात तत्काळ निर्णय घेण्याच्या दृष्टीने 01 एप्रिल 2022 पासून राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांकडून आंदोलनात्मक भूमिका घेऊन ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करण्याचा इशारा रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष गुणवंत पाटील, उपाध्यक्ष दिनेश महाजन, सचिव दिलीप साबळे, विठ्ठल पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत.


