धक्कादायक : बलात्कारानंतर अल्पवयीन गर्भवती ; कुटुंबीयांनी आरोपीशीच लावले लग्न


Nagapur Rape नागपूर : लैंगिक अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या पीडितेचे आईवडीलांनी लग्न नराधमाबरोबरच लावल्याची धक्कादायक घटना नागपुरामध्ये घडली आहे. पीडिता 12 वर्षांची असून आरोपीचे वय 22 वर्ष आहे. पीडिता आणि आरोपी शेजारी असून पीडितेची आई नसल्याने वडील कामावर गेल्यावर ती घरीच एकटी राहत होती. याचाच फायदा घेत आरोपीने बालिकेचे लैंगिक शोषण केले. मात्र पीडिता गर्भवती राहिल्यानंतर ही बाब दोन्ही कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलिसांत तक्रार न करण्याचे ठरवत पीडिता आणि आरोपीच्या कुटुंबियांनी पीडितेचे लग्न आरोपीसोबतच लावून दिले.

प्रेमाच्या जाळ्यात ओढत शोषण
शेजारी राहणार्‍या 22 वर्षीय तरुणाने त्याचाच फायदा घेत पीडित बालिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे शारीरिक शोषण (rape) केले. ती गर्भवती झाल्यानंतर दोन्ही कुटुंबाना ही बाब लक्षात आली. यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर समझोता करत पोलिसांकडे तक्रार न करण्याचे ठरविले आणि वयाने 10 वर्ष मोठ्या आरोपी तरुणाचे लग्न 12 वर्षीय मुलीसोबत लावून देण्यात आले. पीडिता चार महिन्याची गर्भवती असल्याने नुकतच तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लग्नाची बाब उघडकीस आली.

आरोपीला पोलिसांकडून अटक
या प्रकरणी पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 22 वर्षीय आरोपी विरोधात बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पोलिसांना यासंबधीत माहिती मिळाल्यानंतर चौकशी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत पीडितेची विचारपूस करण्यात आली. तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब दोन्ही कुटुंबीयांनी लपविली.

मुलीकडील मंडळींविरोधातही गुन्हा
कायद्याच्या विरोधात जाऊन तिचे बाराव्या वर्षी लग्न लावले या आरोपाखाली पोलिसांनी आरोपीच्या पालकांविरोधातही बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पीडिता चार महिन्याची गर्भवती असल्याने सध्या तिची शारीरिक अवस्था ठीक नसल्याने तिला डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !