भुसावळातील शिवभोजन केंद्राचे तिसर्या वर्षात पदार्पण
कोरोना काळात भागली हजारो गरजूंची भूक : सेवेसाठी नमा शर्मा तत्पर
भुसावळ : बदलत्या काळात स्थित्यंतरे अनेक झाली असलीतरी समाजातील एक घटक असा आहे की ज्याला एक वेळ जेवण मिळण्याची भ्रांत आहे, ज्यांना रोजगार नाही, ते शहरात रोजगारासाठी जातात मात्र उत्पन्न अत्यल्प असल्याने त्यांना स्वस्तात भोजनाची सोय नसल्याने राज्य शासनाने शिवभोजन केंद्र संकल्पना राबवण्यास सुरुवात केली. समाजातील गरीब व कष्टकर्यांना किमान एक वेळ पोटभर जेवण मिळावे, या उद्देशाने राज्य सरकाने 2020 साली शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत भुसावळातील गरीब व वंचित घटकांना शिवभोजन थाळी योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. भुसावळातील कट्टर शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा यांनी शहरातील जुन्या पालिकेजवळील वरणगाव रोडवर शिवभोजन केंद्र सुरू केले असून रविवार, 27 रोजी या केंद्राने तिसर्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले.
भुसावळात गरजूंना केंद्राचा मोठा दिलासा
भुसावळातील शिवभोजन केंद्रामुळे गरीब व वंचित घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे शिवाय कोरोना काळात या केंद्रामुळे गोरगरीब, बेघर असलेल्या गरजूंची भूक भागली. कोरोना काळात या केंद्रातून गरजूंना मोफ दाल-चावल, भाजी व दोन पोळ्या असा मेनू देण्यात आला. नंतर पाच रुपये रुपयात पार्सल सुविधा तर आता शिवभोजन केंद्रावरील थाळी दहा रुपयांप्रमाणे दिली जात असल्याचे नमा शर्मा म्हणाले.


मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचा ऋणी
शिवभोजन केंद्राचे संचालक नमा शर्मा म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सेवा देण्यासाठी माझी निवड केल्याने मी त्यांचा ऋणी आहे. स्व.बाळासाहेबांच्या उपदेशाप्रमाणे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या अनुषंगाने आपले काम सुरू आहे. भुसावळातील शिवभोजन केंद्राने तिसर्या वर्षात यशस्वी पर्दापण केल्याने शिवभोजन थाळीत बुंदी लाडू व गुलाबजामूनचे वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. प्रसंगी मुक्ताईनगरचे छोटू भोई, अफसर खान, वरणगावचे हिप्पी सेठ, शिवसेना शहरप्रमुख निलेश महाजन, अॅड.कैलास लोखंडे, अमजद खान, कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत (नमा) शर्मा आदी उपस्थित होते.


