भुसावळात कर्मचारी संपामुळे महावितरणसह डाक सेवेला फटका
भुसावळ : केंद्र शासनाच्या कामगार धोरणाविरोधात कामगार संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारपासून दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे. सोमवारी संपामुळे महावितरण, टपाल विभाग, रेल्वे मेल सर्व्हिस, दीपनगर औष्णिक केंद्र आदींवर काहीसा परीणाम झाल्याचे दिसून आला. केंद्र शासनाने कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द कराव्या, वीज दुरुस्ती विधेयक रद्द करावे यासह अन्य मागण्यांसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारपासून दोन दिवसीय संप पुकारला आहे. शहरातील महावितरणच्या सेवेवर संपाचा सर्वाधिक परीणाम झाला.
आयुध निर्माणी कामगार संघाचा पाठींबा
केंद्रीय कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात देशभरात दोन दिवसीय संप पुकारण्यात आला. या संपाला आयुध निर्माणी कामगार युनियन व विविध संघटनांनी पाठींबा दर्शवला. आयुध निर्माणीत कामगारांनी निदर्शने करुन विरोध प्रदर्शन करीत संपाला पाठींबा दर्शवला. दरम्यान, टपाल विभागातील ऑल इंडिया पोस्टल एम्पॉईज संघटना ग्रुप सी व डी चे 38 कर्मचारी संपात सहभागी होते. रेल्वे मेल सेवेतील एनएफपीई संघटना संपात सहभागी झाल्याने सोमवारी कार्यालयीन कामकाज, बॅग डिस्पॅचचे कामे खोळंबली. दीपनगरात वीज निर्मितीवर परीणाम नसला तरी मंगळवारी परिणाम होण्याची भीती आहे. महानिर्मितीच्या सब ऑर्डीनेट इंजिनिअर असोसिएशन, ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशन, वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य विद्यूत तांत्रिक कामगार युनियनसह 25 संघटना सहभागी झाल्या.




