अनधिकृतरीत्या गौण खनिजाची वाहतूक ; मुदतीत दंड न भरणार्या वाहनांचा होणार लिलाव
जळगाव : वाहनांवर असलेली दंड रक्कम मुदतीत जमा न झाल्यास सदर वाहनांचा लिलाव करुन जप्त मालमत्तांची विक्री करण्यात येईल, असे आदेश भडगावचे तहसीलदार नेहा भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये काढले आहेत.
प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर वाहने जप्त
भडगाव तालुक्यातील अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करताना अढळून आलेली वाहने जप्त करुन तहसील कार्यालय भडगाव येथे लावण्यात आलेली आहेत. सदर वाहन मालक यांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केल्याने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 48 पोटकलम 7 व 8 (1) (2) मधील तरतुदी तसेच महाराष्ट्र जमीन महसुल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) (सुधारणा) नियम 2017 चे नियम 9 पोटकलम (1)(2) मधील तरतुदी नुसार दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु संबधित वाहन मालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अदयाप केलेला नसल्याने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 176 ते 184 मधील तरतुदी नुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून उक्त नमुद तरतुदी नुसार जप्त वाहनांचा लिलाव करुन लिलावातुन प्राप्त होणारा दंड महसुल शासनास जमा करण्याची कार्यवाही या कार्यालया कडील वाहन लिलाव उद्घोषना 25 मार्च, 2022 नुसार प्रस्तावीत करण्यात आलेली आहे.


4 एप्रिलपूर्वी भरावी दंडाची रक्कम
या वाहनांवर वित्तीय संस्थावर कर्ज बोजा असल्यास 4 एप्रिल, 2022 पुर्वी या कार्यालयास संपर्क करुन दंड रक्कम जमा करण्यात यावी प्रस्तुत वाहनांवर असलेली दंड रक्कम मुदतीत जमा न झाल्यास सदर वाहनांचा लिलाव करुन जप्त मालमत्तांची विक्री करण्यात येईल याची सर्व वित्तीय संस्थांनी नोंद घ्यावी, असे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी भडगाव नेहा भोसले यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.


