भुसावळ पालिकेच्या दिव्याखाली अंधार ; 24 तासात बंद एलईडी बदलण्याचे आश्‍वासन हवेत


सत्ताधारी नगरसेवकांना मनस्ताप ; दोन लाख लोकसंख्येच्या शहरासाठी अवघा एकच वायरमन

भुसावळ : सुमारे वर्षभरापूर्वी म्हणजे 4 ऑगस्ट रोजी भुसावळसह मुक्ताईनगर, बोदवड व सावदा नगरपंचायतीशी एसएलएनपी या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ईईएसएल या कंपनीत उर्जा बचतीचा करार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत भुसावळात झाला होता. या करारानंतर 50 टक्के वीज बिलात बचत होणार असल्याचा व अवघ्या 24 तासात एलईडी नादुरुस्त झाल्यानंतर ते बदलण्याची ग्वाही खुद्द खडसेंसह सत्ताधारी व संबंधित कंपनीने दिली होती मात्र सत्ताधार्‍यांचे आश्‍वासन हवेत विरले असून सत्ताधारी नगरसेवकांच्या वॉर्डात महिनाभरापासून दिवे बंद असताना कुणीही दाद-पुकार ऐकत नसल्याची स्थिती आहे. सत्ताधारी नगरसेवकाची ही अवस्था तर विरोधकांबाबत बोलायला नको, अशी स्थिती आहे.

प्रभाग 20 मध्ये पथदिवे बंद
सत्ताधारी नगरसेवक पिंटू (महेंद्रसिंग) ठाकूर यांच्या वॉर्डात सुमारे महिनाभरापेक्षा अधिक काळापासून हायमास्ट व पोलवरील एलईडी बंद आहेत. महिनाभरापासून ते संबंधित ठेकेदार व वायरमन यांना विनवणी करीत आहेत मात्र संबंधित फोन उचलायला तयार नाही. 24 तासात एलईडी सुरू करण्याचा दावा त्यावेळी सत्ताधार्‍यांनी केल्याने जनता आता नगरसेवकांना जाब विचारत आहे मात्र दोन लाख लोकसंख्येच्या शहरासाठी अवघा एकच वायरमन नियुक्त करण्यात आल्याने संताप व आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

यंत्रणा आहे कुठे ?
संबंधित ठेकेदार व वायरमन आमचा फोन उचलत नाही. एसएमएस करूनही उपयोग होत नाही. जनता आम्हाला 24 तासात तुम्ही एलईडी बदलून देणार होते याबाबत जाब विचारत होते शिवाय यासाठी पालिकेत स्वतंत्र यंत्रणाही उभी केली जाणार होती ? ती आहे कुठे? असा प्रश्‍न विचारत असल्याचे पिंटू ठाकूर यांनी सांगितले.

सत्ताधार्‍यांमुळे नाथाभाऊ तोंडघशी
तीन महिन्यात शहराचा विकास करू, असे आश्‍वासन माजी मंत्री खडसेंनी भुसावळकरांना देत पालिकेत भाजपाची सत्ता आणली होती शिवाय खडसेंप्रमाणे आमदार सावकारेंच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्‍वास ठेवला होता मात्र सत्तेच्या सुमारे तीन वर्षात नेमका काय विकास झाला? असा प्रश्‍न जनता विचारत आहे. सत्ताधार्‍यांमुळे खडसे तोंडघशी पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दोन महिन्यांनी विधानसभा निवडणुका असून याबाबत मतदार सत्ताधार्‍यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही हेदेखील तितकेच खरे !


कॉपी करू नका.
WhatsApp Group