नागरीकत्व कायद्याविरोधात फैजपूर प्रांत कार्यालयावर मोर्चा

फैजपूर : केंद्र शासनाने अंमलात आणलेला नागरीकत्व कायद्यात दुरुस्ती व फेरबदल नुकतेच केले असल्याने नागरीकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात फैजपूर मुस्लिम बांधवांतर्फे भव्य मोर्चा लोकशाही मार्गाने शुक्रवारी फैजपूर प्रांत कार्यालयावर काढण्यात आला.
प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा
नागरीकत्व दुरूस्ती कायदा केंद्र शासनाने त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी फैजपूर शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी शुक्रवारी रोजी दुपारी तीन वाजता फैजपूर शहरातील मिल्लतनगरपासून फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात चालू असलेल्या राजकीय घडामोडी दरम्यान एका विशेष समाजाला वगळून बेकायदेशीरपणे एनआरसी व कॅबसारखे कायदे लागू करणे हे न्यायाच्या दृष्टीने योग्य नाही. एनआरसी व कॅब सारखे कायदे धर्माच्या आधारे लागू करणे व विशेष धर्म समाजाशी भेदभाव करून लागू करणे हे संविधानाचा अपमान आहे. या देशात जन्मापासून राहत आहेत त्यांना आता त्यांची नागरीकता कागदोपत्री प्रमाणे देणे हा त्यांच्यावर अन्याय असून मानव अधिकाराचा देखील उल्लंघण आहे. दरम्यान, एनआरसी व कॅबला भारतीय नागरीक व लोकांचे जनहितार्थ त्वरीत रद्द करून विना शर्त मागे घ्यावे, अशी मागणी या निवेदनाअंती करण्यात आली.
15 हजार समाजबांधवांचा मोर्चात सहभाग
फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना अब्दुल रऊफ जनाब, मौलाना हाजी हमीद अहेमद कासमी, मौलाना शरीफ अहेमद, हाफिज अनस, डॉ अब्दुल जलील, सैय्यद असगर (सावदा), सावदा नगरसेवक फिरोज खान, इरफान मेंबर (चिनावल), अफसरखान, मुक्ताईनगर, अकिलुद्दीन फारुकी, कालु मिस्तरी, सलमान शेख, सादिक शेख आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. या मोर्चाचे आयोजन माजी नगरसेवक शेख जफर, जलील शेख हाजी अब्दुल सत्तार, नगरसेवक कलिम खां मण्यार, नगरसेवक शेख कुर्बान, सलिम हाजी उस्मान यांच्यासह फैजपूर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी केले होते. हा भव्य मोर्चा मिल्लतनगर, कब्रस्थानमार्गे लक्कडपेठ, कासारगल्लीमार्गे सुभाष चौक, छत्री चौक मार्गे प्रांत कार्यालय असा काढण्यात आला. यानंतर मोर्चाचा प्रांत कार्यालयाजवळच समारोप करण्यात आला. या मोर्चात रावेर यावल तालुक्यातील जवळपास 15 हजार पेक्षा जास्त मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले. मोर्चाचे महत्व लक्षात घेता फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.


