ग्रामीण भागातील असल्याचा न्यूनगंड मनातून दूर करा

निलेश गोरे : आमोद्यातील घ.का.विद्यालयात बक्षीस वितरण
फैजपूर : ग्रामीण शब्दाचा इंग्रजीतून अर्थ लक्षात घ्या व आपल्यातील क्षमता विचारात घेऊन ग्रामीण असल्याचा न्यूनगंड दूर करा, आय कॅन हा शब्द लक्षात ठेवून आय कॅन, आय शुड, आय मस्ट ही यशासाठी ची त्रिसूत्री कायम लक्षात ठेवा, असे आवाहन वेलनेस फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश गोरे यांनी येथे केले. आमोदे, ता. यावल येथील घन:शाम काशीराम विद्यालयाचा वार्षिक पारीतोषिक वितरण सोहळा शुक्रवारी वद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. याप्रसंगी गोरे बोलत होते
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कथाकथनकार प्रा.व.पू.होले होते. प्रमुख अतिथी म्हणून वेलनेस फाऊंडेशनचे संस्थापक निलेश गोरे होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील, चेअरमन सुभाषद महाजन, चिटणीस महेंद्र सरोदे, खाजगी प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन एकनाथ लोखंडे, सदस्य विवेक लोखंडे, मोहन लोखंडे, धनराजशेठ चौधरी, चंद्रकांत पाटील, माजी मुख्याध्यापक के.एच.पाटील, व्ही.टी.जावळे, पी.पी.जाधव तसेच देणगीदार दाते उपस्थित होते.
यशाने हुरळून जावू नका -होले
अध्यक्षीय भाषणातून कथाकथनकार प्रा. व. पु. होले यांनी मुलांना यशाने हुरळून जाऊ नका, फक्त यश मिळवू नका तर यशात सातत्य ठेवले तरच आनंद चिरकाल टिकतो. विद्यार्थीदशेचा त्रास मानू नका, टाकीचे घाव सोसलेल्या दगडालाच फुले वाहिली जातात त्यासंदर्भात सुंदर कथा सांगून मुलांना खिळवून ठेवले व मुलांना यश मंत्राचे आपल्या ओघवत्या शैलीतून कथन केले. मुख्याध्यापक एस.बी.बोठे यांच्या संकल्पनेतून व संस्थेचा विश्वास व पाठींब्याने ‘वाढदिवस माझ्या मुलांचा’ व ‘चला वाचूया’ या दोन उपक्रमाचे उद्घाटन प्रा.श्री व. पु. होले, निलेश गोरे भुसावळ यांच्या हस्ते करण्यात आले.
55 विद्यार्थ्यांचा गौरव
बक्षीस वितरण प्रसंगी इयत्ता दहावीत मुलांमधून प्रथम आलेला चिरंजीव तनिष्क दीपक पाटील व मुलींमधून प्रथम आलेली आरती दगडू रोझोतकर यांना सन्मानित करण्यात आले. शिक्षकांसाठी असलेल्या बक्षिसासाठी लिना इंगळे, मीनाक्षी नारखेडे, जे.व्ही.वानखेडे तसेच जवळपास 55 विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संजीव बोठे यांनी करून दिला. बक्षिसाचे वाचन एल.पी.पिंपरकर यांनी केले. सूत्रसंचालन ईश्वर चौधरी तर आभार डी.डी. सपकाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी घ.का. विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व खाजगी प्राथमिक शाळा आमोदे येथील शिक्षक बंधूंनी परीश्रम घेतले.


