चाळीसगावात पोलिसांनी सतर्कतेने रोखली 70 लाखांच्या गुटख्याची तस्करी : कंटेनर चालकासह तिघे जाळ्यात
चाळीसगाव शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई : गुटख्याची तस्करी पुन्हा ऐरणीवर
In Chalisgaon, the police alertly intercepted the smuggling of Gutkha worth 70 lakhs : three arrested along with the container driver चाळीसगाव : चाळीसगावातील वाहतूक पोलिसांनी पुन्हा आपल्या सतर्कतेचा प्रत्यय दिला असून राजस्थानमधून नाशिककडे होणारी गुटख्याची तस्करी रोखत तब्बल 70 लाखांचा गुटखा आयशर वाहनातून जप्त केला आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता झालेल्या कारवाईप्रकरणी रात्री उशिरा हरीयाणातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
संशय ठरला खरा
शहरातील बस स्थानकासमोरून गुरुवार दुपारी एक वाजता आयशर (क्र. एच.आर. 74 बी 2490) जात असताना गस्तीवरील शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांच्यासह नाईक नरेंद्र पाटील, नाईक दीपक पाटील, चालक हवालदार शांताराम थोरात आदींना संशय आला व त्यांनी वाहन अडवत त्याची तपासणी केली असता त्यात 60 लाख 26 हजार 152 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत राज निवास पानमसाला व जाफरानी जर्दा तंबाखू आढळल्याने ती जप्त करण्यात आली तसेच दहा लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक असा एकूण 70 लाख 26 हजार 152 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.






तिघा आरोपींना अटक
या प्रकरणी नशीब खान हुसैन खान (34, ग्राम घसेडा, ता.होडल, जि.फरीदाबाद, हरीयाणा), सोहेल खान नजबु खान (21, ग्राम पालमपूर, ता.फरीदाबाद, हरीयाणा), साजीद याकुब खान (30, आलमपूर, ता.जि. फरीदाबाद, हरीयाणा) यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपड, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, चाळीसागव शहरचे निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे एपीआय तुषार देवरे, नाईक नरेंद्र पाटील, दीपक पाटील, चालक शांताराम थोरात यांच्या पथकाने केली. तपास सहा.निरीक्षक दीपक बिरारी, विनोद भोई, राहुल सोनवणे, दीपक पाटील, विनोद खैरनार, अमोल पाटील आदी करीत आहेत.


