माऊली नगरात घरफोडी : आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Burglary in Mauli Nagar : Accused in MIDC police net जळगाव : शहराजवळील खेडी शिवारातील माऊली नगरात घरफोडी प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुनील अमरसिंग बारेला (गोर्यापाडा, ता.चोपडा) यास गुरुवारी अटक करण्यात आली. संशयीताला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
घरफोडीप्रकरणी दाखल होता गुन्हा
जळगाव शहरातील खेडी शिवारातील माऊली नगरात शिरीष चंद्रकांत चौधरी यांच्याकडे 25 जून 2022 रोजी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी दोन मोबाईल, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला होता व एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.






गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना चोटयाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, इमरान सय्यद, साईनाथ मुंडे यांच्या पथकाने संशयित आरोपी सुनील अमरसिंग बारेला यास गुरुवारी दुपारी 12 वाजता अटक केली. आरोपीवर यापूर्वी दरोडा, चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयात न्या.जे.एस.केळकर यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता संशयित आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड.स्वाती निकम यांनी युक्तीवाद केला.


