पुतणीच्या हळदीला आलेल्या काकांचा वरणगावात अपघाती मृत्यू
Accidental death of uncle who came to nephew’s haldi in Varangaon भुसावळ : वरणगाव येथे पुतणीच्या हळदीसाठी आलेल्या जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथील काकांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. सुकदेव जनार्दन तायडे (55, रा.कानसवाडा, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वरणगाव शहरातील आराधना हॉटेलसमोर घडला.
फेकरी जाताना अपघात
वरणगाव येथील महर्षी वाल्मिक नगरात गुरुवारी सुकदेव तायडे यांच्या लहान भावाच्या मुलीचा हळदीचा कार्यक्रम तर शुक्रवारी विवाह सोहळा होता. यासाठी सुकदेव जनार्दन तायडे हे जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथून त्यांची दुचाकी (एम.एच.19 सी.के.9330) या दुचाकीने सहकुटूंब वरणगाव येथे आले होते. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम आटोपून गुरुवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सुकदेव तायडे हे वरणगाव या गावापासून काही अंतरावर असलेल्या भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील नातेवाईकाकडे जात असताना दुचाकी अपघातात तायडे यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी तायडे यांना वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयत हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितीजा हेडवे यांनी त्यांना मयत घोषित केलं. या प्रकरणी भीला शांताराम कोळी यांनी दिलेल्या खबरीवरुन वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सुकदेव तायडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परीवार आहे.






साध्या पद्धत्तीने पार पडला विवाह
सुकदेव तायडे जखमी असून आयसीयूमध्ये दाखल असल्याचेच सांगण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सर्वत्र पसरली. सुकदेव तायडे यांच्या मृत्यूमुळे धामधुमीत होणारा पुतणीचा विवाह सोहळा साध्या पध्दतीने एका मंदिरात पार पडला. या घटनेने ज्या घरात आनंदाचे वातावरण होते, त्याठिकाणी शोककळा पसरली आहे. शोकाकुल वातावरणात सुकदेव तायडे यांच्यावर त्यांच्या कानसवाडा या गावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.


