संतापजनक : पोलिस उपनिरीक्षकाकडून तरुणीकडे विवस्त्र व्हिडिओची मागणी
Outrageous: Police sub-inspector demands nude video from young woman इस्लामपूर : मुंबई पोलिस दलातील निलंबित उपनिरीक्षका शंकर जयवंत पाटणकर (32, रा. बोरगाव, ता. वाळवा) याच्याविरोधात ईस्लामपूरात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपीने तब्बल 14 वर्ष पाठलाग करीत विनयभंग केला तसेच तरुणीकडे विवस्त्र व्हिडिओची मागणी केल्याचा आरोप आहे.
विविध कलमान्वये गुन्हा
पीडितेच्या फिर्यादीवरून शंकर पाटणकर याच्याविरुद्ध विनयभंगाच्या विविध कलमासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा करताना पाटणकर याने दुचाकी (क्र. एमएच 10 सी.डब्ल्यू.100) आणि मोटार (क्र. एम.एच.10 डीसी 100) अशा दोन वाहनांचा वापर केला आहे.






तब्बल 14 वर्ष पाठलाग
पीडिता सहावीत असल्यापासून पाटणकर तिचा पाठलाग करत होता. जानेवारी 2009 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत त्याने तिचा मानसिक छळ केला आहे. ‘तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत हा पाटणकर अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग करत होता. मोबाइलवर व्हिडीओ संपर्क करत स्वतः विवस्त्र होऊन पीडित मुलीकडेही अशीच मागणी करत होता. तसेच ती नृत्य स्पर्धेसाठी जाईल त्याठिकाणी जाऊन पाटणकर व्हिडीओ चित्रीकरण करायचा. कधी दुचाकी तर कधी मोटार आडवी मारत मुलीस अडवून तिचा हात धरत होता. हा सर्व त्रास असह्य झाल्यावर पीडितेने पोलिसात धाव घेतली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अरविंद काटे अधिक तपास करत आहेत.
मुंबईतही गुन्हा दाखल
मुंबई पोलिसात असणार्या शंकरविरुद्ध शिवाजीनगर-गोवंडी येथील 24 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा मार्च 2022 मध्ये दाखल आहे. या मुलीच्या मोबाईलवर त्याने अश्लील संदेश आणि छायाचित्रे पाठवली होती. आता इस्लामपूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.


