भुसावळातील प्रधानमंत्री आवास योजनेतील 350 घरकुलांसाठी 60 लाखांचा निधी मंजूर
आमदार संजय सावकारे यांचा पाठपुरावा : लाभार्थींना मोठा दिलासा
60 lakhs sanctioned for 350 houses under Pradhan Mantri Awas Yojana in Bhusawal भुसावळ : प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने मंजूरी दिलेल्या व काम सुरू असलेल्या घटक चार खालील आर्थिकदृष्या दुर्बल घटक प्रकल्पाच्या केंद्र शासनाकडून दिल्या जाणार्या दुसर्या हिश्श्याचे 350 घरकुलांसाठीचे 60 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान भुसावळ पालिकेला देण्यात आले आहे. पहिल्या हिश्यानंतर रखडलेल्या बांधकामांना यामुळे गती येणार आहे. आमदार संजय सावकारे यांनी या घरकुल कामांना वेग मिळावा, म्हणून दुसर्या टप्प्यातील निधी मिळण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने लाभार्थींमधून समाधान व्यक्त होत आहे.
निधी रखडल्याने लाभार्थींचे हाल
पंतप्रधान आवास योजनेतून लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी मिळणारा केंद्र सरकारकडील निधी रखडला होता. मान्यता मिळाल्याने अनेक लाभार्थींनी घरकूले बांधली, उधार, उसनवारी करून पैसे घेत घरकूले बांधून पूर्ण केली. तर दुसर्या टप्प्यातील निधी नसल्याने अनेकांची बांधकामे रखडली होती. या योजनेतील 350 लाभार्थ्यांसाठी भुसावळ पालिकेला 60 लाख 60 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या लाभार्थींना नियमांनुसार तो वितरीत केला जाईल. याबाबत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने भुसावळ पालिकेला कळवले आहे.

पाठपुराव्याला यश : लाभार्थींमध्ये समाधान
केंद्र शासनाच्या बीएलसी खाली मंजूर प्रकल्पाला वितरीत केल्या जाणार्या निधीचा योग्य विनियोग तसेच प्रकल्पाची भौतिक प्रगतीवर नियंत्रणाची जबाबदारी मुख्याधिकार्यांची राहणार आहे. या कामांमध्ये अनियमितता आढळून येवू नये, तसेच सदर प्रकल्पाच्या घरकुल बांधकामाच्या नकाशांना सक्षम प्राधिकरणाची मंजूरी असणे गरजेचे असेल. यासोबत पात्र लाभार्थी पीएमएवाय – एमआयएसला अपलोड करणे अनिवार्य राहणार आहे. या लाभार्थींना आता अनुदान मिळणार असल्याने रखडलेले काम पूर्ण होईल, तसेच काहींनी उधार, उसनवारीने किंवा कर्जाने घेतलेल्या रक्कमेची परतफेड करता येणार आहे. दरम्यान, आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने लाभार्थींमधून समाधान व्यक्त होत आहे.
