यावल शहरातील 25 वर्षीय तरुणाची शेतविहिरीत उडी घेत आत्महत्या
A 25-year-old youth of Yaval city committed suicide by jumping into a farm well यावल : शहरातील न्यू व्यास नगर भागातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय तरुणाने सातोद रस्त्यावरील शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली मात्र तब्बल 36 तासानंतर गुरुवारी तरुणाचा शोध घेण्यात यश आले. शवविच्छेदनानंतर आवेद गबू तडवी (25) या तरुणावर बीडगाव, ता.चोपडा येथील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
विहिरीत उडी घेत आत्महत्या
यावल शहरातील विस्तारीत भागात न्यू व्यास नगरातील रहिवासी आवेद गबु तडवी (25) हा तरुणाने बुधवारी सकाळी दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए. एल. 1485) घेऊन सातोद रस्त्यावरील सुनील भोईटे (रा.यावल) यांच्या शेताजवळ दुचाकी लावुन सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शेत विहिरीत उडी घेतली. बुधवारपासुन सुमारे 175 फुट खोल विहिरीत त्याचा मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होते शज्ञ) गुरुवारी दुपारी पावणेदोन वाजेला त्याचा मृतदेह पट्टीचे पोहणारे समाधान दामु कोळी व रमेश दंगल भिल (रा.वढोदा) यांनी खोल पाण्यातुन शोधून काढला. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातलगांना सोपवला. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन महिन्याचा मुलगा असा परीवार आहे.






आत्महत्येचे कारण अस्पष्ट
तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. घटनास्थळी यावल तालुक्यासह चोपडा तालुक्यातील समाजबांधवांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलिस उपनिरिक्षक प्रदिप बोरूडे, हवालदार संजय देवरे, किशोर परदेशी, अनिल साळुंखे यांनी भेट दिली होती तर या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत तरुण हा प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती, यावल येथे डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत होता व तो मूळचा बीडगाव, ता.चोपडा येथील रहिवासी असल्याने मूळ गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


