अवैध वाळूची माहिती दिल्याचा राग : अंजाळेतील कोतवालावर प्राणघातक हल्ला

पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल : शासकीय कामकाजात निर्माण केला अडथळा


Anger over giving information about illegal sand: Kotwala in Anjale assaulted यावल : यावल तालुक्यातील अंजाळे गावात कोतवाल ओंकार लिलाधर सपकाळे हे महसूल प्रशासनास अवैध वाळूची माहिती पुरवतात व आरोपींच्या ट्रॅक्टरवरच कारवाई होत असल्याच्या रागातून कोतवाल सपकाळे यांना शनिवारी दुपारी अडीच वाजता पाच संशयीतांनी मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला शिवाय वाद सोडवण्यात आलेल्या कोतवालाच्या भावासह वडिलांना मारहाण करण्यात आली.

अवैध वाळू वाहतुकीची माहिती दिल्याच्या रागातून हल्ला
प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तालुक्यातील अंजाळे घाटात महसूल, विभागाने बैठे पथक नियुक्त केले असून या पथकात अंजाळे येथील कोतवाल ओंकार लिलाधर सपकाळे यांचादेखील समावेश आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तलाठी सूर्यवंशी व कोतवाल हे तलाठी कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी जात असताना गावातील संशयित धनराज शांताराम सपकाळे, सागर निवृत्ती तायडे, देवानंद अशोक शंकोपाळ, तोताराम शांताराम सपकाळे, देवेश शशीकांत सपकाळे (सर्व रा.अंजाळे, ता.यावल) यांनी तलाठी कार्यालयात घुसून कोतवाल सपकाळे यास तुला माझेच ट्रॅक्टर दिसते का रे ? दुसर्‍यांचे ट्रॅक्टर दिसत नाहीत काय? असा प्रश्न करत कोतवाल सपकाळे यांना चापटा-बुक्क्यांनी तसेच लाथांनी तोंडावर, डोक्यावर मारहाण केली. तलाठी सूर्यवंशी यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न करूनही उपयोग झाला.

कोतवालाच्या कुटुंबियांनाही मारहाण
त्यानंतर ग्रामस्थांसह सपकाळे यांचे वडील लिलाधर नामदेव सपकाळे (62) व भाऊ जितेंद्र सपकाळे तेथे आल्यानंतर त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कोतवाल सपकाळे यांनी तक्रार दिल्यानंतर यावल पोलिस ठाण्यात पाचही संशयीतांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रदीप बोरुडे तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !