दीपनगरात वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे चटणी भाकर आंदोलन
Chutney bread agitation by Vanchit Bahujan Contractors Association in Deepnagar भुसावळ : स्थानिक प्रकल्पबाधीत ठेकेदारांना काम मिळावे त्याच प्रमाणे निविदामधील अटी आणि नियम शिथील करण्यासाठी वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दीपनगर येथे चटणी भाकर आंदोलन करण्यात आले.
स्थानिक कंत्राटदारांना मिळणार कामे
यावेळी दीपनगर केंद्राचे माजी मुख्य अभियंता तथा संघटनेचे सल्लागार आर.आर.बावस्कर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदार, सचिव प्रकाश तायडे, शब्बीर शेख यांनी मार्गदर्शन केले. दीपनगर प्रशासनाने दुपारी एक वाजता उपमुख्य अभियंता लोटके यांच्या दालनात संघटनेसोबत चर्चा केली. याप्रसंगी संघटनेच्या मागण्या रास्त असून स्थानिक कंत्राटदारांना कामे दिले जातील, असे आश्वासन देण्यात आले. स्थानिक कंत्राटदार यांच्या वर अन्याय होणार नाही असे प्रशासनाने सांगितले.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, महासचिव दिनेश इखारे, कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, स्थानिक कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष फिरोज पठाण,सैय्यद इरफान पठाण, महाराष्ट्र कंत्राटदार संघटनेचे प्रभाकर सोनवणे, शिवसेना तालुकाध्यक्ष संतोष सोनवणे, निलेश महाजन, मनसेचे विनोद पाठक यांनी जाहीर पाठिंबा दिला. आंदोलन यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष मन्साराम कोळी, प्रकाश तायडे, संतोष तेलंग, उस्मान पठाण, नारायण झटके, रवी सरदार, जगदीश तराळ, निशांत निकम, नितीन पटाव, विजय भालेराव यांनी परीश्रम घेतले. तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सुरक्षा अधिकारी रवी व्यास यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
