कापसाला वाजवी भावासाठी मुक्ताईनगरात 3 रोजी जनआक्रोश मोर्चा
Public outcry march in Muktainagar on 3rd for fair price of cotton मुक्ताईनगर : केंद्रासह राज्यातील सरकारचे शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून कापसाला योग्य भाव देण्यासह सीएमव्ही रोगाची भरपाई मिळावी यासह विविध न्याय मागण्यांसाठी व कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चाचे शुक्रवार, 3 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता काढण्यात येणार आहे. गोदावरी मंगल कार्यालयापासून सुरू होणार्या मोर्चाचे नेतृत्व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, अॅड.रोहिणी खडसे करणार आहेत.
या मागण्यांसाठी होणार आंदोलन
कापसाला 15 हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा तसेच प्रती क्विंटल अनुदान देण्यात यावे, सीएमव्ही रोगामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकर्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, पीक विमा कंपन्यांकडून केळी बागांची वारंवार पडताळणी बंद करण्यात यावी, वन्य प्राण्यांमुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकर्यांच्या खात्यात तत्काळ जमा करण्यात यावी, महावितरण कडून शेतकर्यांची वीज तोडणी तत्काळ थांबवण्यात यावी यासह विविध न्याय मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सहभागाचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

