भुसावळ विभागात 44 टन कचर्‍याची विल्हेवाट

रस्ते झाले चकाचक : डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम


Disposal of 44 tonnes of waste in Bhusawal section भुसावळ : महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित भुसावळ विभागात बुधवार, 1 मार्च 2023 रोजी भुसावळ विभागात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सदस्यांनी भल्या पहाटे हातात झाडू घेत वर्दळीच्या रस्त्यांवरील कचर्‍यासह शासकीय कार्यालयाच्या आवारात साचलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावली. भुसावळ शहरासह विभागात एकूण सुमारे 44 टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली.

शासकीय कार्यालयांचे आवार झाले स्वच्छ
महास्वच्छता अभियानात यावल व चोपडा येथील 29 शासकीय कार्यालयांसह 10 रस्त्यांची पद्मश्री विभूषित महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय तीर्थरूप डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात 985 श्री सदस्यांनी स्वच्छता केली. 2023 हे वर्ष थोर समाज सुधारक महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या वर्षभरात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत विविध समाज उपयोगी कार्यक्रमांची उभारणी भुसावळ विभागात होत आहे.

भुसावळातून 10 टन कचर्‍याचे संकलन
भुसावळ : शहरात बुधवारी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत भुसावळ येथील 554, यावल येथील 242 व चोपडा येथील 189 श्री सदस्यांनी 23 ट्रॅक्टरच्या मदतीने भुसावळ शहरातील 10.64 टन कचर्‍याची विल्हेवाट लावली. यावल शहरातून 24.950 तर चोपडा येथून 7.935 असा एकूण 43.520 टन कचरा शहरातील नियोजित डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आला. भुसावळ शहरातील नगरसेवक पिंटू कोठारी, दुर्गेश ठाकूर हे सुद्धा उपस्थित होते.

यावल शहरातील रस्ते चकाचक
यावल : स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ.आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी व डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने बुधवारी महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपुर्ती निमित्त यावल शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. सरकारी कार्यालय व शहरातील प्रमुख रस्ते येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यात दरवर्षी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पुनर्भरण असे विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. बुधवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित स्वच्छता अभियान हे यावल येथील मनोहर उद्यान ते बोरावल गेट, तहसील कार्यालय, गुरांचा दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन, भूमी अभिलेख कार्यालय परीसर, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विकास प्रकल्प परीसर, नगरपरीषद परिसर, न्यायालय परीसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परीसर, यावल बस स्थानक परीसर, पंचायत समिती परिसर आदी ठिकाणी राबविण्यात आले. 242 स्वच्छतादूत यांनी शहरातील सात ट्रॅक्टर वाहनातून ओला आठ टन 405 किलो व सुका 16 टन 560 किलो असा एकूण 24 टन 950 किलो कचरा जमा केला.

सावदा शहरातही स्वच्छता अभियान
सावदा :
महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दीनिमित्त शहरातही स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरातील बस स्टॅन्ड, दुर्गा माता चौक, आ.गं.हायस्कूल, पोलिस स्टेशन, गुरांचा दवाखाना, शहरातील सर्व वैकुंठधामसह विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सुमारे पंधराशे स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !