अॅड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीन अर्जावर आज जळगावात सुनावणी
Adv. Praveen Chavan’s bail proceedings today जळगाव : जळगाव शहरातील निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी तत्कालीन सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांना अटक केली असून त्यांची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, अॅड.चव्हाण यांना न्यायालयाने पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सरकार पक्षाने बुधवारी जळगाव सत्र न्यायालयात रीव्हीजन दाखल केले असून त्याबाबत शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रीव्हीजनसंदर्भात न्यायालयात नेमकी काय सुनावणी होते ? याकडे लक्ष लागले आहे.
अॅड.चव्हाण अटकेनंतर कोठडीतच
रविवारी दुपारी चाळीसगावात आलेल्या अॅड.प्रवीण चव्हाण यांना अटक करण्यात आल्यानंतर सोमवारी न्या.आर.वाय.खंडारे यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती तर अॅड.चव्हाण यांच्यातर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आला मात्र सरकार पक्षाने बुधवारी जळगावात न्यायालयाचे न्या.एस.बी.वावरे यांच्या न्यायासनापुढे बुधवारी क्रिमिनल रीव्हीजन क्रमांक 22/2023 दाखल केल्यानंतर गुरुवारी त्याची सुनावणी होवून संबंधिताना नोटीसा इशू करण्यात आल्या तर शुक्रवारी पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अॅड.प्रवीण चव्हाण यांचा गुन्ह्यातील सहभाग पाहता सरकार पक्षाने पोलिस कोठडीची मागणी केली मात्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सरकार पक्षाने वरच्या कोर्टात रीव्हीजन दाखल केले आहे. तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड करीत आहेत.

