अंत्यसंस्काराला गोळी लागून एकाचा मृत्यू : सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाला दोन वर्ष शिक्षा
जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल : दोन हजार रुपये दंडाचीही शिक्षा
One killed by bullet at funeral: Retired police inspector sentenced to two years जळगाव : रीव्हॉल्व्हर निष्काळजीपणाने वापरल्याने झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकांना दोन वर्ष सश्रम कारावासासह दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जळगाव न्यायालयाने सुनावली. विठ्ठल श्रावण मोहकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या सेवानिवृत्त पोलिस अधिकार्याचे नाव आहे.
अंत्यसंस्कारात घडली दुर्घटना
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल श्रावण मोहकर यांच्या वडीलांचे 11 मे 2019 रोजी निधन झाले. पिंप्री गावातील स्मशानभूमीत अंत्यविधीचा कार्यक्रम सुरू असतांना विठ्ठल मोहकर यांनी आकाशात दोन फायर केले मात्र त्यानंतर विठ्ठल मोहकर यांचा मुलगा दीपक मोहकर याने विठ्ठल मोहकर यांच्याकडून रीव्हाल्व्हर घेवून फायर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यातील गोळी सुटून ती तुकाराम वना बडगुजर (65, रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) यांना लागली व त्यांचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी मयत तुकाराम बडगुजर यांचे नातेवाईक राजू कृष्णा बडगुजर यांच्या तक्रारीवरुन विठ्ठल मोहकर व त्यांचा मुलगा दीपक मोहकर यांच्याविरुध्द धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पित्याला कारावास : मुलाची निर्दोष सुटका
जळगाव जिल्हा न्यायालयात जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुराव्याअंती न्या. एस.आर.पवार यांनी आरोपी विठ्ठल मोहकर यांना दोन वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड व भारतीय शस्त्र अधिनियमाचे कलम 30 नुसार सहा महिने साध्या कारवासाची शिक्षा सुनावली तर संशयित आरोपी दीपक मोहकर याची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड.रमाकांत सोनवणे यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून हर्षवधन सपकाळे यांनी सहकार्य केले.
