नायगाव गावातील सरपंचावर अविश्वास प्रस्ताव पारीत


यावल : तालुक्यातील नायगाव येथील महिला सरपंच यांनी दिलेला शब्द न पाळल्याने 13 पैकी 12 सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर गुरुवारी तहसीलदारांनी घेतलेल्या विशेष सभा आयोजित करण्यात आली व त्यात अविश्वास पारीत करण्यात आला.

उर्वरीत काळात विभागून मिळणार सरपंच पद
नायगाव येथे अनुसूचित जमातीच्या महिलेकरीता सरपंचपद राखीव असून एकूण तीन महिला सदस्यांमध्ये सरपंच पद विभागून देण्याचा निर्णय झाला होता मात्र त्यांनी शब्द पाळला नाही परीणामी नायगाव येथील सरपंच शरीफा तडवी यांच्याविरुद्ध उपसरपंच सह सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या अविश्वास प्रस्तावावर गुरुवारी नायगाव ग्रामपंचायतीत तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. या सभेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 13 पैकी 12 सदस्यांनी मतदान केले व अविश्वास प्रस्ताव पारीत करण्यात आला. या सभेत उपसरपंच सोनल रामदास पाटील, सदस्य नरेंद्र पाटील, चेतन पाटील, अजय पाटील, उत्तमराव सपकाळे, महेंद्र तडवी, नूरजहान तडवी, वृषाली पाटील, ज्योती देशमुख, रमाबाई कोळी, आलिशान तडवी, राजू तडवी व शरीफा तडवी यांची उपस्थिती होती. या विशेष सभेचे कामकाज ग्रामसेवक विलास साळुंखे यांनी पाहिले. दरम्यान, आता उर्वरीत तीन वर्षात आलिशान तडवी व नूरजहान तडवी यांना विभागून सरपंच पद दिले जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !