सावदा पालिकेचा करवाढ नसलेला 78 कोटींचा अर्थसंकल्प सादर
78 crore budget presented without tax increase of Savada Corporation सावदा : सावदा नगरपालिकेचा 2023-2024 या अर्थसंकल्पीय वर्षासाठी 78 कोटी 48 लक्ष 13 हजार 484 रुपयांचा व 24 लक्ष रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नुकताच प्रशासक कैलास कडलग यांनी सादर केला. यात सावदा शहरातील नागरीकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.
अर्थसंकल्पात शहर विाकासासाठी तरतूदी
महसुली आवक विविध करातून 13 कोटी 70 लाख रुपये तर विविध अनुदाने यातून 48 कोटी 55 लाख 55 हजार रुपये अंदाजीत आवक गृहीत धरून खर्चाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात शहर विकासासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. यात सर्वात विशेष म्हणजे शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी अमृत 2.0 योजने अंतर्गत 18 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यात शहरातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन व इतर गोष्टींचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. याच सोबत वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी तीन कोटी, हद्दवाढ झालेल्या भागात विकास कामांसाठी दोन कोटी, 15 व्या वित्त आयोगातील कामांसाठी तीन कोटी, रस्ते विकासासाठी दोन कोटी, तसेच पथदिवे, नवीन संडास तट बांधणे, गटारी बांधणे आदी कामांसाठी भरीव तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकार्यांची लवकरच मिळणार मंजुरी
अर्थसंकल्प मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल विशाल पाटील, अंतर्गत लेखापाल भारती पाटील, रोखपाल विमलेश जैन आदींनी तयार करून 22 फेब्रुवारी 2023 रोजी पालिकेचे प्रशासक कैलास कडलग यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी त्यास मान्यता देऊन लवकरच सदर अर्थसंकल्प जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
