‘प्रवास स्त्री शक्तीचा’ मधून मांडली स्त्रियांची यशोगाथा

भुसावळच्या दिडशे महिलांचा संस्कारक्षम अप्रतिम कलाविष्कार ः प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजन


भुसावळ : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त ‘प्रवास स्त्रीशक्तीचा’ हा नृत्य, नाट्य व संगीतावर आधारीत भव्य कार्यक्रम सादर करण्यात आला. यात सहा वर्षांच्या लहान मुलीपासून 72 वर्षांच्या आजीपर्यंत तब्बल दिडशे महिलांनी आपल्यातील कलेचा संस्कारक्षम आविष्कार घडविला. यात गृहिणी, डॉक्टर, वकील, शिक्षिका, विद्यार्थ्यांनी व युवती अशा सार्‍यांचा समावेश होता. संतोषी माता हॉल मध्ये शनिवारी झालेल्या या भव्य सांस्कृतिक समारंभाचे नियोजन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, इनरव्हील क्लबच्या डॉ.रश्मी शर्मा, बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या संचालिका डॉ.संगीता बियाणी, सक्षम फाउंडेशनच्या संचालिका आरती चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, रोटरीचे विकास पाचपांडे, रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर, भाजपचे शहराध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्त्री शक्तीच्या प्रवासाचे सादरीकरण
भारताच्या ऐतिहासीक ठेव्यांचे जतन करण्यासाठी संस्कृती, संस्कार व पूर्वजांचे शौर्य त्याग यातून उभा राहिलेला स्त्री शक्तीचा प्रवास मांडण्यात आला. यात जिजामाता, राणी पद्मिनी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आदी कर्तृत्ववान महिलांचा संघर्ष व यशोगाथा नृत्य नाट्य व संगीताच्या माध्यमातून मांडतांना आधुनिक स्त्रीयांची व्यथा व कथा देखील मांडण्यात आली. त्याच बरोबर आजच्या स्त्रियांनी कायदा व दिलेल्या स्वातंत्र्य चा दुरुपयोग, घरात जेष्ठांचे महत्व व सावित्रीबाईच्या व्यथा असे विविध नाट्यचा माध्यमातून सांगण्यात आले. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे त्यांच्या टिमने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन आपल्या नृत्यातुन घडविले. यात जात्यावरच्या ओवी ‘जन्म बाईचा बाईचा या गीतावर महिलांची दिवसभर दमछाक कशी होते यातूनही आनंदी जीवन कसे? जगतात याचे सुरेख सादरीकरण केले.

सर्वच वयोगटातील महिलांचा सहभाग
याप्रसंगी सिंधूताई सपकाळ, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सरोजनी देवी नायडू आदींच्या वेशभुषा ही सादर करण्यात आल्या. कार्यक्रमात सर्वच वयोगटातील महिला सहभागी झाल्या होत्या यात सर्वात लहान असलेल्या सहा वर्षांच्या काव्या जैन अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील नाटीकेत लहानपणीची अहिल्यादेवीची भुमिका केली तर कुटुंबातील ज्येष्ठांचे महत्व या नाटीकेत जयश्री ढाके या 72 वर्षांच्या आजीने भूमिका केली. सुमारे चार तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून होते.

सन्मान स्त्रीत्वाचा पुरस्कार
कार्यक्रमात आयुष्यात सत्तर वर्षांपासून अनेक महिलांचे सुखरूप बाळंतपण करणार्‍या गंगुबाई कुमावत व सायकलिंग व रनिंग मध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्‍या शिक्षिका प्रिया पाटील यांचा ‘सन्मान स्त्रीत्वाचा’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळातील सदस्य अनिता आंबेकर, दीपा पटेल, मनीषा काकडे, सरला सावकारे, लता सोनवणे, श्रद्धा चौधरी, पल्लवी झोपे, जयश्री चौधरी, वैशाली सैतवाल, अलका भटकर, सुनंदा भारुळे यांनी परीश्रम घेतले..

कार्यक्रमातून सुप्त कलागुणांना वाव
आपल्या भारतीय संस्कृतीचा सदुपयोग करून महिला उन्नती करून घेऊ शकतात हे नवीन पिढीला पटवून देणे व महिलांमधील सुप्त गुणांना वाव देणे हा प्रवास ‘स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनेक महिला पहिल्यांदाच रंगमंचावर आल्या खुद्द शिक्षिका असलेली माझी नणंद सरला सावकारे पहिल्यांदाच मंचावर आल्या असल्याचे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !