महिलेचा खून करीत मृतदेह कन्नड घाटाच्या पायथ्यानजीक फेकला : चाळीसगाव तालुक्यात खळबळ
Chalisgaon shocked by murder : Woman killed and body thrown in Kannada Ghat चाळीसगाव : अज्ञात महिलेचा खून करून आरोपींनी मृतदेह तालुक्यातील कन्नड महामार्ग क्र. 211 वरील घाटाच्या पायथ्याजवळ फेकल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे सुमारे तीन महिन्यांपूर्वी महिलेचा खून झाल्याचा अंदाज असून एका गोणपाटात केवळ महिलेची हाडे मिळून आल्यानेर चाळीसगाव ग्रामीण पोलीसस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेची ओळख पटवण्यासह आरोपींना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
खून करून महिलेचा मृतदेह फेकला
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चाळीसगाव-कन्नड महामार्गावरील घाटाच्या पायथ्याजवळ असलेल्या दर्ग्यापासून अंदाजे दोनशे मीटर अंतरावर पुर्व दिशेला बोढरे गावाच्या शिवारातील नियतक्षेत्र कक्ष क्रमांक 313 मधील घाणेरीच्या झुडूपात एका गोणपाटात केवळमृतदेहाची हाडे मिळून आली आहेत. अज्ञात आरोपींनी महिलेचा खून करून या भागात मृतदेह आणून फेकल्याची दाट शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने पंचनामा करीत हाडांचा सांगाडा जप्त केला असून तपासाला सुरूवात केली आहे. वन विभागाचे वनपाल दीपक किसन जाधव यांनी या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 मार्च 2023 च्या साधारण दोन ते तीन महिन्यापुर्वी हा गुन्हा घडल्याचा अंदाज आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे करीत आहेत.

