बसमधून उतरताना गर्दीचा फायदा घेत एक लाखांचे दागिने लंपास :जामनेर बसस्थानकातील घटना
Pimpalgaon woman passenger’s jewelry worth lakhs stolen by thieves जामनेर : बसमधून उतरताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा येथील महिला प्रवाशाच्या एक लाखांच्या सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी मंगळवारी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गर्दीचा फायदा घेत केली चोरी
साबेरा सांडू तडवी (58, रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) या सोमवार, 13 रोजी या मालेगाव येथून जामनेरला बसने आल्यानंतर बसमधून दुपारी चार वाजेच्या सुामरास उतरत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पिशवीतून एक लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व महत्त्वाचे कागदपत्रे लांबवली. पिशवीत 60 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅमचे मंगळसूत्र, 30 हजारांचे सोन्याचे लॉकेट, 15 हजारांची रोकड तसेच बँक पासबुकसह अन्य महत्त्वाची कागदपत्रे होती. तडवी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक राजू तायडे करीत आहे.


