उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का : माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत शिवसेनेत
Former minister Dr Deepak Sawant from the Uddhav Thackeray faction joins CM Eknath Shinde Shiv Sena मुंबई : शिंदे गटाला धनुष्यबाणासह शिवसेना नाव मिळाल्यानंतर शिवसेनेत इनकमिंग वाढत असून ठाकरेंच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहेत. राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे समर्थक दीपक सावंत यांनी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वी ठाकरेंचे निकटवर्तीय आणि माजी केंद्रीय मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला तर आता दीपक सावंत यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.
प्रसिद्धीपासून दूर राहणारे व्यक्तीमत्व
डॉ. दीपक सावंत यांनी दुर्गम भागात शिवसेनेसाठी मोठं काम केलं आहे. आरोग्यमंत्री असताना त्यांनी सर्वसामान्य नागरीकांना सेवा दिली. कमी बोलणारे आणि प्रसिद्धीपासून दूर राहून जास्त काम करणारे अशी त्यांची ओळख आहे. कोरोना काळातही त्यांनी चांगलं काम केलं होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

2019 मध्ये दिला राजीनामा
जानेवारी 2019 मध्ये डॉ.दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांना डच्चू दिला होता. दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये त्यावेळी नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती त्यावेळी पुढे आली होती.
