धरणगावच्या लाचखोर नायब तहसीलदारांसह कोतवालास दोन दिवसांची पोलिस कोठडी
Kotwala along with corrupt naib tehsildars of Dharangaon are in police custody for two days जळगाव : अवैधरीत्या वाळू वाहतूक करू देण्यासह वाहनांवर कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती 25 हजांराची लाच स्वीकारताना धरणगावचे नायब तहसीलदार जयवंत पुंडलिक भट (51, रा.काळकर गल्ली, एरंडोल) व कोतवाल राहुल नवल शिरोळे (30, रा.पाळधी) यांना गुरुवारी दुपारी जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली होती. संशयीताना शुक्रवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, लाच प्रकरणात काही बड्या अधिकार्यांची चौकशी शक्य असल्याची सूत्रांनी दिली.
तडजोडीअंती स्वीकारली 25 हजारांची लाच
जळगावातील रायसोनी नगरातील वाळू व्यावसायीकाचा वाळूचा डंपर जप्त करण्यात आल्यानंतर तो सोडवण्यासह वाळू वाहतूक नियमित सुरू राहू देण्यासह कारवाई टाळण्यासाठी 30 हजारांची लाच नायब तहसीलदार भट यांनी मागितली होती तर यापूर्वी 1 मार्च रोजी 30 हजार व 11 मार्च 23 हजार रुपये जयवंत भट यांनी घेतले होते मात्र त्यानंतरही लाचेचा मोह आवरता न आल्याने कोतवालाच्या माध्यमातून पुन्हा 30 हजारांची मागणी करण्यात आली व 25 हजारात तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार करताच सापळा रचण्यात आला. गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजता कोतवालाने पाळधी पोलीस दुरक्षेत्राच्या बाजुस असलेल्या रस्त्यावर 25 हजारांची लाच स्वीकारल्यानंतर त्यास अटक करताच तहसील कार्यालयातून नायब तहसीलदाराला अटक करण्यात आली.
दोघा संशयीतांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
नायब तहसीलदार भट व कोतवाल शिरोळे यांना शुक्रवारी जळगाव न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव व सहकारी करीत आहेत.