फैजपूरच्या हाजी बांधवांची सतर्कता : बेपत्ता इसमाला अखेर भेटले आप्तेष्ट

फैजपूर : फैजपूर परीसरात पायी फिरून मिळेल ते खावून गुजराण करणार्या उत्तरप्रदेशातील मनोरुग्णाची तीन वर्षानंतर आपल्या कुटुंबाची भेट घडवण्यात शहरातील हाजी बांधवांना यश आले आहे. गेल्या चार महिन्यांपासून या भागात रामकुमार हेमराज यादव (57, बभणपूरा, कप्तानगंज पोलिस स्टेशन, आजमगड, उत्तरप्रदेश) हे सरकारी नोकरीत असताना तीन वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्यात फरक झाल्याने ते घर सोडून निघाले मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नसतानाच ते फैजपूर परीसरात धडकले. तब्बल चार महिन्यांपासून ते या भागात फिरत असतानाच शहरातील हाजी शेख खली शेख करीम व हाजी नासीर शे.करीम यांच्याशी त्यांची ओळख झाली व महिनाभरापासून ते उभयंतांच्या संपर्क असल्याने त्यांना नाव-गाव विचारल्यानंतर दोघा हाजी बांधवांनी सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे, विजय पाचपोळे, इकबाल सैय्यद, अमजद पठाण, उमेश चौधरी आदींना माहिती दिली. पोलिसांनी कप्तानगंज पोलिस स्टेशन संपर्क साधल्यानंतर बभणगाव येथील सरपंच रामदशरथ यादव यांच्या मोबाईलवर बेपत्ता असलेल्या रामकुमार यांचा फोटो पाठवल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटवली. सोमवारी उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे नातेवाईक श्रावण यादव यांच्या ताब्यात रामकुमार यांना सोपवण्यात आले.


