साकळी ते शेगाव पदयात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात


यावल : श्री सच्चिदानंद स्वरूप बहुउद्देशीय संस्था साकळी संचलित, श्री संत गजानन महाराज फाउंडेशनवतीने आयोजित साकळी ते शेगाव पदयात्रेचा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात झाला. ही पदयात्रा गेल्या नऊ वर्षापासून आयोजित केली जात आहे. सुरुवातीला मनवेल रोड वरील जोशीज् फार्मवरील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात विधीवत अभिषेक व महाआरती करण्यात आली. यानंतर पदयात्रेला सुरुवात होऊन तिचे साकळी गावात आगमन झाले. यात्रेदरम्यान संपूर्ण यात्रा मार्गावर शारदा विद्या मंदिर शाळेपासून ते नेवे वाणी गल्लीच्या कोपर्‍यापर्यंत स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या. वारकरी संप्रदायानुसार विविध अभंग गाऊन तसेच महाराजांचा जयघोष करून यात्रा मार्गस्थ झाली तर गावात पदयात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. अतिशय मंगलमय -प्रसन्नमय तसेच धार्मिक वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या पदयात्रेचे स्वरूप पाहून गावातील सर्व भाविक भक्तांना एक धार्मिक आत्मतृप्ती होत असल्याची अनुभूती आीली.

पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
हनुमान पेठेतील श्री हनुमान मंदिराजवळ श्याम महाजन मित्र परीवारातर्फे तसेच शिरसाड येथील सरपंच गोटू सोनवणे व मित्र परिवार- ग्रामस्थांतर्फे भाविकांना चहापाणी व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावल येथेही घोडेपीर बाबांच्यादर्ग्याजवळ सारंग बेहेडे यांनी चहा-पाण्याची व्यवस्था केलेली होती. रशीद बाबा आश्रमाचे गादीपती छोटू बाबा नेवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच साकळी येथील ग्रामपंचायत सदस्य सै.अशपाक सै.शौकत यांनीही ही यात्रेतील भाविकांचा सत्कार करून धार्मिक एकतेचे दर्शन घडविले.


कॉपी करू नका.