डोंगरकठोरा खून प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करा


यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथे ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या खुन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून या गुन्ह्यातील मोकाट असलेल्या काही संशयीतांना अटक करावी, अशी मागणी मयत व्यक्तीच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. या खूनामध्ये गावातीलच एका व्यक्तींचा सहभाग असल्याचा त्यांना संशय असून पोलिसांनी त्यांना अद्याप पर्यंत का अटक केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. डोंगरकठोरा, ता.यावल येथे 3 ऑक्टोंबर 2019 रोजी शरीफ मेहरबान तडवी (19) या तरुणाचा खून झाला होता. तेव्हा मयताचा भाऊ आसिफ तडवी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञातां विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास चक्र फिरवत या गुन्ह्यात एका अल्पवयीनसह रमजान महारू तडवी (रा.मारूळ) यास अटक केली होती मात्र या खुनाच्या गुन्ह्यातील खरा मास्टरमाइंड अद्यापही गावात फिरत असल्याचे फिर्यादीने व मयताच्या कुटुंबीयांने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संबंधीत संशयीताला पोलिसांनी अद्यापपर्यंत का अटक केली नाही ? अशी विचारणा होत असून संबंधीतास तत्काळ अटक करावी, अशा मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.


कॉपी करू नका.