31 लाखांच्या दुध पावडरची विल्हेवाट : आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सात वर्षांनी लागला आरोपीचा तपास : आरोपीविरुद्ध भारतभरात गुन्हे : अन्य चौघा पसार आरोपींचा राजस्थानात डेरा
जळगाव : मेहसाना येथून विशाखापट्टनम (आंधप्रदेश) येथे दूध पावडर घेवून निघालेल्या ट्रकच्या मालकासह अन्य चौघांनी चाळीसगावातील कन्नड घाटात मालाची विल्हेवाट लावल्याची घटना 21 ते 26 ऑगस्ट 2013 दरम्यान घडली होती. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल क67रण्यात आला होता. या गुन्ह्यातील ट्रक मालक राजेंद्र अमरसिंग वाघेला (67, गोध्रा, गुजरात) यास तब्बल सात वर्षानंतर अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दरम्यान, या आरोपीने भारतभरात अशाच पद्धत्तीने गुन्हे केल्याची माहिती आहे. या गुन्ह्यात आणखी चार आरोपींचा समावेश असून ते राजस्थानातील असल्याची माहिती आहे. त्यांना मात्र अद्याप अटक नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोपनीय माहितीवरून अटक
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या नेतृत्वात एएसआय अशोक महाजन, हवालदार रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील, दीपक पाटील, मुरलिधर बारी आदींच्या पथकाने केली. दरम्यान आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


