धुळ्यात अवैधरीत्या गॅस सिलिंडर रिफिलिंग : गुन्हे शाखेच्या छापेमारीत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त


Illegal gas cylinder refilling in Dhulr : Crime branch raids seized goods worth 2.5 lakhs धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील देवपूर भागातील प्रोफेसर कॉलनीत अवैधरीत्या वाहनांमध्ये घरगुती गॅस रीफिलिंग करणार्‍यांच्या मुसक्या आवळत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने शहरात मोठी खळबळ दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून व्हॅन, 38 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी हरी ओम गॅस एजन्सी मालकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
प्रोफेसर कॉलनीत गिरीष उर्फ बबलु पांडुरंग चौधरी हा त्याने कामावर ठेवलेल्या लोकांकडुन त्याच्या राहत्या घरात घरगुती सिलेंडरचा बेकायदेशीर साठा करुन घराच्या मागील बाजुस असलेल्या मोकळया सिलेंडरमधील गॅस वाहनात इंधन म्हणून भरत असल्याची माहिती शनिवार, 22 रोजी एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळताच त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. एलसीबीच्या पथकाने गिरीष चौधरी याच्या घरावर छापा टाकत कामगार प्रदीप रुपचंद सूर्यवंशी (रा.विष्णू नगर, भतवाल टॉकीज जवळ, देवपूर) हा ओमिनी वाहनात (क्र.एम.एच. 18 डब्ल्यु 0573) गॅस भरताना आढळल्याने त्याच्यासह ओमनी मालक अमृत सुपडू वाघ (रा. एस.आर.पाटील हायस्कुल समोर, इंदीरा नगर, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले. गिरीष चौधरी याच्या घराची झडती घेतली असता घरात 20 भरलेले व 18 रीकामे भारत गॅस कंपनीचे सिलेंडर मिळुन आले. प्रदीप सूर्यवंशी याच्याकडे विचारपुस केली असता त्याने हा व्यवसाय गिरीष ऊर्फ बबलु पांडुरंग चौधरी याचा असून जप्त करण्यात आलेले गॅस सिलेंडर हरी ओम गॅस एजन्सी (लामकानी, ता.धुळे) येथून पुरविण्यात आल्याचे सांगितले. प्रदीप सूर्यवंशी याच्या ताब्यातून एक लाख 35 हजार रुपये किंमतीचे भारत गॅस कंपनीचे एकुण 38 गॅस सिलेंडर, एक लाखांची ओमनी कार व 15 हजार रुपये किंमतीचे गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रीक मोटार, वजनकाटा, नोझल असा एकूण दोन लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी प्रदीप रुपचंद सूर्यवंशी (49, विष्णू नगर), व्हॅन चालक अमृत सुपडू वाघ (43, रा.एस.आर.पाटील हायस्कूल समोर, इंदिरा नगर, धुळे), मालक गिरीष ऊर्फ बबलु पांडुरंग चौधरी, हरी ओम गॅस एजन्सीचा मालक यांच्याविरुध्द देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, संदीप सरग, योगेश चव्हाण, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, देवेंद्र ठाकुर, जगदीश सुर्यवंशी, कैलास महाजन यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !