वाघाडीतील लाचखोर मंडळाधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात
सातबार्यावरील विहिर नोंद कमी करण्यासाठी दहा हजारांची लाच भोवली
Bribery councilor Dhule in Waghadi in ACB’s Net धुळे : सातबारा उतार्यावर चुकीने विहिरीची नोंद झाल्यानंतर ती कमी करण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती दहा हजारांची लाच स्वीकारताना शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील मंडळाधिकारी अशोक चिंधू गुजर यास धुळे एसीबीने अटक केली. मंगळवारी दुपारी शिरपूर येथील आरोपीच्या राहत्या घरात हा सापळा यशस्वी करण्यात आला. धुळे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्यानंतर शिरपूर तालुक्यातील महसूल विभागातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
राहत्या घरात स्वीकारली लाच
वकवाड, ता.शिरपूर येथील तक्रारदाराची वडिलोपार्जित शेतजमीन असून त्या जमिनीवर चुकून विहिर नसतानाही तशी नोंद झाल्याने त्यांना शासकीय अनुदान मंजुरीसाठी अर्ज करता येत नव्हते. वाघाडी मंडळाधिकारी अशोक गुजर यांची भेट घेतल्यानंतर शेतजमिनी संदर्भात यापूर्वी केलेल्या हक्कसोड कामाचे बक्षीस म्हणून तसेच सातबारा उतार्यावरील विहिरीची नोंद कमी करण्याच्या मोबदल्यात 15 हजारांची लाच मागितल्यानंतर दहा हजारात तडजोड झाली व या संदर्भात सोमवार, 8 मे रोजी तक्रारदाराने दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी मंडळाधिकारी गुजर यांनी शिरपूर येथील मिलिंद नगरातील राहत्या घरी तक्रारदाराला लाच रक्कम देण्यासाठी बोलावल्यानंतर लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलाणेकर, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी यशस्वी केला.